नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शेताच्या (Farm) बांधावर सहज आढळणाऱ्या आणि औषधी गुणधर्म असलेल्या कवठ (Kavath) या फळाला आता जागतिक बाजारपेठ मिळणार आहे. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या (KTHM College) वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी ‘कपिथ्याः’ या नावाने उपक्रम सुरू करून कवठाच्या व्यापारीकरणाला नवी दिशा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून हा उपक्रम कृषी, आयुर्वेद आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात नवा अध्याय लिहिणार आहे.
या विद्यार्थ्यांनी (Student) केवळ कवठ विक्रीचा विचार न करता त्यावर प्रक्रिया करून २५ प्रकारचे वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार केले आहेत. हा उपक्रम विशेषतः महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आला आहे. कारण कवठ हे महादेवाचे अत्यंत प्रिय फळ मानले जाते. औषधी गुणधर्म, आयुर्वेदिक उपयोग आणि पौष्टिकता यामुळे कवठाचे महत्त्व प्राचीन काळापासून मान्यता प्राप्त आहे. मात्र, या फळाकडे अद्याप व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले गेले नव्हते. या विद्यार्थ्यांनी कवठाच्या उत्पादनावर संशोधन करून त्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार करण्यास सुरुवात केली आणि स्थानिक शेतकऱ्यांना (Farmer) थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्याचा संकल्प केला आहे.
दरम्यान, या उपक्रमात वनस्पतीशास्त्र विभागातील (Department of Botany) विद्यार्थी नवनाथ आहेर, प्रतीक्षा वाघ, वैष्णवी विभांडिक, जयश्री महाले आणि श्रावणी निकम सहभागी आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. नितीन गायकवाड आणि वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ. के. एम. खालकर व इतर सर्व प्राध्यापक यांची मोलाची साथ त्यांना लाभली आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नेहमीच विद्याथ्यर्थ्यांच्या पाठीशी उभी असते. संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, डॉ. भास्कर ढोके, प्रा. डी. डी. जाधव, डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, प्रा. शशिकांत मोगल यांनी स्वतः विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला भेट देऊन या अभिनव संकल्पनेला पाठिंबा दिला आहे.
कवठाच्या सालीपासून औषधनिर्मिती
या विद्यार्थ्यांनी कवठाच्या सालीचा उपयोग करून सुशोभित वस्तू आणि गृहोपयोगी वस्तू बनवल्या आहेत. तसेच कवठाची साल आयुर्वेदिक औषधांमध्ये उपयोगी पडते. या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक व्यवसायाला चालना मिळणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार नवा आधार
कवठ हे फळ पूर्वी केवळ जंगलात किंवा काही शेताच्या बांधावर सडून जात असे. मात्र, आता या स्टार्टअपमुळे शेतकऱ्यांना त्याची योग्य किंमत मिळणार आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल.
कवठापासून २५ प्रकारचे खाद्यपदार्थ
लोणचे पारंपरिक चव, आरोग्यास लाभदायक, कुटः जेवणासोबत खाता येणारा पौष्टिक पदार्थ, पोळी: गोडसर आणि आरोग्यासाठी फायदेशीर, तिखट चटणीः तिखट-चटकदार चव, आइस्क्रीम : वेगळी आणि थंडगार मिठाई, खीर पोषणमूल्यांनी युक्त, जामः ब्रेड व पराठ्यांसाठी उत्तम पर्याय, जेलीः मुलांसाठी स्वादिष्ट आणि आरोग्यदायी, कॅडी: गोडसर आणि तोंडाला पाणी सुटेल अशी, बिस्कीटः स्नॅक्ससाठी उत्तम, शिराः सणासुदीला स्पेशल, वडीः मऊसर, गोडसर पदार्थ, प्रोटीनः आरोग्यासाठी पोषणयुक्त, कांजी: पारंपरिक हेल्दी ड्रिंक, पाणीपुरीः चटपटीत आणि वेगळ्या चवीची, गोड चटणीः आंबटगोड चव, चाटः स्ट्रीट फूडसाठी नवा पर्याय, सरबतः उन्हाळ्यातील थंडावा, चॉकलेटः मुलांसाठी अनोखा पर्याय, अचारः दीर्घकाळ टिकणारी चव, वाईनः आरोग्यास पोषक, कढीः चवदार, रबडीः चवदार आणि नैसर्गिक, भेळः चमचमीत आणि पौष्टिक, अर्कः आयुर्वेदिक,