नाशिक । प्रतिनिधी
वेगवेगळ्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदवी अभ्यासक्रमास प्रथम वर्ष प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षा देणे बंधनकारक आहे. परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अर्ज करण्याची मंगळवारी अखेरची मुदत होती. मात्र नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) तर्फे मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना सोमवार (दि. ६) पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची संधी आहे, तर शुल्क भरण्यासाठी मंगळवार (दि.७) पर्यंत मुदत असेल.
३ मे २०२० रोजी राष्ट्रीय पातळीवर नीट परीक्षा घेतली जाणार आहे. एमबीबीएस, बीडीएस यासह अन्य सर्व प्रकारच्या वैद्यकीय शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी नीट परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला अर्ज करण्याची प्रक्रिया 2 डिसेंबरपासून सुरू झाली होती. नियोजित वेळापत्रकानुसार मंगळवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत अर्जाची मुदत होती.
मात्र, अखेरच्या दिवशी या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय एनटीएमार्फत घेण्यात आला. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना सोमवारी (ता.६) रात्री ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत अर्ज करता येईल. तर शुल्क भरण्यासाठी मंगळवारी (दि.७) रात्री ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत मुदत असेल. नीट परीक्षा ऑफलाईन स्वरुपात अर्थात पेन व पेपरद्वारे होणार आहे.