नाशिक । प्रतिनिधी
सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये पडून असलेल्या दुचाकीं हटवून पोलीस ठाणी चकाचक करण्यासाठी पोलीस आयुक्ता नांगरे पाटील यांनी पुढाकार घेतला असून यादुचाकींच्या मुळ मालकांचा शोध घेण्यास पोलीसांनी सुरूवात केली आहे. पंचवटी पोलीस ठाण्यातील १११ मालक शोधण्यात पोलीसांना यशही मिळाले आहे.
अनेक वर्षांपासून विविध गुन्ह्यांमध्ये तसेच अपघातांत, बेवारस अशी जमा केलेली वाहने पोलीस ठाण्यांमध्ये वर्षानुवर्षे धुळखात पडून असल्याचे चित्र पहावयास मिळते. पोलीस ठाण्याच्या इमारतीजवळ अनेकदा या वाहनांचा खच पडेला असतो.तर या वाहनांच्या मुळ मालकांचा शोध घेताना पोलिसांची दमछाक होत असल्याने ‘भंगार’ वाढतच जाते. यामुळे पोलीस ठाणे की जुन्या वाहनांचे गुदाम? असा प्रश्न बघणार्यांनाही पडतो.
यामुळे पोलीस ठाण्याच्या सौंदर्यात बाधा येत असते. ही बाब ओळखून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पुढाकार घेत त्यांनी पोलीस ठाण्यांच्या आवारातील वाहनांची योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्वच पोलीस ठाण्यांमधील बेवारस वाहनांची शोधमोहीम हाती घेण्यात येत आहे. यासाठी पुण्याच्या एका संस्थेची मदत घेतली जात असून भंगार झालेल्या वाहनांमधील बेवारस वाहनांच्या मुळ मालकांचा शोध घेतला जात आहे. सातपूरनंतर पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील तब्बल १११ वाहनांच्या मुळ मालकांपर्यंत पोलिसांना पोेहचता आले.
याची सुरूवात सातपूर पोलीस ठाण्यापासून करण्यात आली. यांनतर पंचवटी पोलीस ठाण्यातील बेवारस वाहने पुणे येथील गंगामाता वाहन वाहन शोध पथकाच्या मदतीने पंचवटी पोलिसांनी शोधली. ज्या वाहनांचे मुळ मालक मिळून आले आहे, त्यांची वाहने त्यांच्याकडे सुपुर्द केले जातील. अन्यथा उर्वरीत वाहनांचा लिलाव करून विक्री करण्यात येणार आहे. त्या मालकांशी याबाबत संपर्क साधला जात आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या आवारात धुळखात असलेल्या वाहनांपैकी १११ चारचाकी, रिक्षा, दुचाकी मालकांचा शोध पोलिसांना लागला आहे. यामध्ये ७ रिक्षा, ८ चारचाकी, ९६ दुचाकींचा समावेश आहे.
काही वाहनांवर बनावट क्रमांक असल्याचे आढळून आले. मात्र पोलिसांनी वाहनांची चेजीस नंबर आणि इतर माहितीच्या आधारे मुळ वाहन धारकांचा शोध घेतला आहे. या वाहन मालकांशी संपर्क साधला जात असून त्यांना वाहनाची मुळ कागदपत्रे घेऊन पोलीस ठाण्यात बोलवले जात आहे. त्यात आरसी बुक व आधार कार्डचा समावेश असून वाहनाची ओळख पटल्यास मालकास वाहनास देण्यात येणार आहे. अन्यथा उर्वरीत वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.
– अशोक भगत, वरिष्ठ पोलीस निरिक्षक पंचवटी