नाशिक । दिनेश सोनवणे
नाशिक जिल्ह्यात आदिवासी दुर्गम भाग वगळता सर्वच तालुक्यांत सधन शेती केली जाते. आर्थिक मंदी, घटलेले रोजगार यामूळे सुशिक्षितांनीदेखील वडीलोपार्जित शेतीत बदल करत चांगले उत्पन्न मिळविण्यास सुरुवात केली. प्रयोगशील शेती साकारत अनेक शेतकरी इतर शेतकर्यांना मोफत मार्गदर्शनदेखील करत आहेत. यामूळे स्वतःसोबतच इतर सहकारी शेतकर्यांच्या उत्पन्नतात वाढ झाली असून याद्वारे आर्थिक विकास साधला जात आहे.
वातावरणीय बदलांमूळे शेतकर्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला गेला आहे. मात्र, खचून न जाता दिंडोरी, निफाड, सिन्नर तसेच कसमादेमधील शेतकर्यांनी पुन्हा एकदा उभारी घेत शेतीत नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली आहे. शेतकरी आता माती आणि पाणी परिक्षण करुन शेतीतील पिकांना आणि जमीनीला गरजेूनसार खत खाद्य देऊ लागले आहेत. परिणामी उत्पन्नात भर पडलेली दूसरीकडे खत खाद्यांवरील अमाप खर्चही काही अंशी कमी झाला असल्याचे शेतकरी सांगतात.
दुसरीकडे अनेक शेतकर्यांनी शेतीपुरक जोडधंद्यालाही पसंती दिली आहे. यामध्ये पोल्ट्री व्यवसाय, दुग्धोत्पादन, काही ठिकाणी अंड्यांचे पोल्ट्री आता वाढू लागलेले दिसून येतात. अनेक शेतकरी पोल्ट्रीसाठी लागणारे खत (फिड) तयार करण्यासासाठी पुढाकार घेऊन चांगले अर्थार्जन यातून मिळवत असल्याचे दिसून येते.
नियमित असलेल्या शेतीपिकांसोबत आता शेतकर्यांनी इतर शेतकर्यांच्या मदतीने पिकांमध्येही बदल करण्यास सुरवात केली. आपल्या परिसरातील पिकपद्धती बदलू शकते याची माहिती शेतकर्यांना झाली. नवनव्या प्रयोगातून आर्थिक गणित शेतकरी जूळविण्यासाठी प्रयत्न करताना नजरेस पडतात.
कसमादेमधील शेतकरी निर्यातक्षम डाळींबाचे उत्पादन गेल्या अनेक वर्षांपासून घेतले. यामध्ये सुरुवातील मोजक्याच शेतकर्यांना दर्जेदार उत्पन्न मिळत होते. मात्र, यानंतर हळूहळू बदल झाले, इतर शेतकर्यांनी या शेतकर्यांचे मार्गदर्शन घेऊन पिकपद्धतीत बदल केला. याचे चांगले परिणाम दिसून आल्याने पुढे त्यांनीही इतरांना मार्गदर्शन करून हातभार लावला परिणामी हा सर्व परिसर डाळींबाचे दर्जेदार उत्पादन घेणारा परिसर म्हणून नावारूपाला आला.
सेंद्रीय शेतीला पसंती
एकरी शेतीच्या एकूण खर्चापैकी ३० ते ४० टक्के खर्च रासायनिक खतावर होतो. शेतात शेणखत, गोबर गॅसची स्लरी, लेंडीखत व गांडूळ खताचा वापर वाढवल्याने खर्चात घट होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर आता शेतकरी सेंद्रीय शेतीलाही पसंती देऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, सेंद्रीय शेतीतून आरोग्याला धोका कमी असल्याने सेंद्रीय उत्पादनास अलिकडच्या काळात मागणीही वाढलेली दिसून येते.
जैविक खतांचा वापर लाभदायी
जैविक खताचा वापर करुन यंदाच्या अवकाळीवर मात केली. अजूनही माझी द्राक्षबाग सुस्थितीत आहे. माझा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मी एवढ्यावरच थांबलो नाही, तर सोशल मीडियाद्वारे, द्राक्ष विज्ञान मंडळाच्या माध्यमातून हजारो शेतकर्यांचा मार्गदर्शन केले. जिवाणूयुक्त बुरशीनाशके वापरून द्राक्षबागेतून डावणी हद्दपार केला आहे.डॉ. वसंत ढिकले, शेतकरी, सैय्यद पिंप्री
मार्गदर्शन महत्त्वाचे
बदलत्या वातावरणामूळे शेती आता तोट्याची झाली आहे. मात्र, वेळोवेळी शेतीत मार्गदर्शन जमेची बाजू असून अनेक शेतकर्यांनी यातून दर्जेदार उत्पन्न मिळवले आहे. मोसम खोरे डाळींबाचा यशस्वी बेल्ट म्हणून ओळखला जातो. बागलाण पासून हॉलंडपर्यंत येथील डाळींब पोहोचले आहेत, केवळ शेतकर्यांचेच शेतकर्यांना वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन यासाठी कारणीभूत आहे असे मी म्हणेल.
लोटन जाधव, शेतकरी, बिजोटे (ता. बागलाण)