नाशिक । प्रतिनिधी
शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आयुक्तालयातील २१ पोलीस निरीक्षक आणि १५ सहायक पोलीस निरीक्षकांची प्रशासकीय कारणास्तव खांदेपालट केली आहे. दरम्यान, पंचवटी, म्हसरुळ, उपनगर व अंबड या पोलीस ठाण्यांसह शहर वाहतूक विभागातील एक अशा पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचीही अंतर्गत बदली करण्यात आली आहे.
पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. डी. पाटील यांची शहर वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पोलीस आयुक्तांचे जनसंपर्क आधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उपनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांची शहर वाहतूक शाखेत बदली झाली असून त्यांच्या जागी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये यांची वाहतूक शाखेच्या प्रशासन विभागात बदली झाली आहे. तसेच वाहतूक शाखेतील वरीष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव यांची अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षण शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मनोज करंजे यांची पोलीस आयुक्त कार्यालयातील प्रशासन विभागात बदली झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांची तक्रार निवारण कक्षात तर सुभाष देशमुख यांची दहशतवाद विरोधी पथकात बदली झाली आहे.
वाहतूक शाखेत कार्यरत असलेले वरीष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांची म्हसरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली असून म्हसरूळचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांची वाहतूक शाखेच्या जागरुकता अभियान-प्रशिक्षण शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांची तांत्रिक विश्लेषण शाखेत बदली झाली असून त्यांच्या जागी गुन्हे शाखा युनिट दोनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर वाहतूक शाखेतील सुरेंद्र सोनवणे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
तक्रार निवारण कक्षातील किशोर मोरे यांची विशेष शाखेत, दहशतवाद विरोधी पथकाचे राजेश आखाडे यांची नियंत्रण कक्षात, विशेष शाखेचे निलेश माईनकर यांची शहर वाहतूक शाखेत, पोलीस मुख्यालयातील विजय पन्हाळे यांची सरकारवाडा पोलीस ठाण्यात तर वाचक शाखेच्या पोलीस निरीक्षक नम्रता देसाई यांची निर्भया पथक, महिला सुरक्षा विभागाच्या प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यासह दंगल नियंत्रण पथकाचे अनिल पवार यांची शहर वाहतूक शाखेत, तांत्रिक विश्लेषण शाखेतील इरफान शेख यांची पोलीस आयुक्त यांचे वाचक म्हणून बदली झाली आहे.
या सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या(एपीआय) बदल्या
पोलीस आयुक्तांनी आयुक्तालयातील १५ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यातील १२ आधिकार्यांच्या बदल्या पदोन्नतीवर पदस्थापना आवश्यक असल्याने करण्यात आल्या असून इतर ४ बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत. महिला सुरक्षा विभागाच्या भावना महाजन यांची पोलीस आयुक्त कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी(पीआरओ) म्हणून बदली झाली आहे. तसेच आर्थिक गुन्हे शाखेचे अशोक काकवीपुरे आणि शांताराम डंबाळे यांची अनुक्रमे सरकारवाडा आणि पंचवटी पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे यांची अंबड पोलीस ठाणे, महेश येसेकर यांची आर्थिक गुन्हे शाखा, दिनेश खैरणार यांची गुन्हे शाखा, सत्यवान पवार यांची पंचवटी पोलीस ठाणे, प्रविण सूर्यवंशी गंगापूर पोलीस ठाणे, यतिन पाटील यांची सरकारवाडा, साजिद मन्सुरी यांची मुंबई नाका, हेमंत नागरे यांची सातपूर, प्रकाश गीते यांची देवळाली कॅम्प, सुधीर पाटील यांची म्हसरूळ, चंद्रकांत सपकाळे यांची अर्थिक गुन्हे शाखा, सुरेश कोरबू यांची सायबर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.