दिंडोरी । प्रतिनिधी
‘ जिल्ह्यात सर्व सहकारी साखर कारखाने बंद पडले असताना कादवाची परिस्थितीही बंद होंण्यासारखची होती. परंतु कादवाचे विद्यमान संचालक मंडळाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काटकसर, नियोजन व पारदर्शी कारभार करत कारखाना सुस्थितीत सुरू ठेवला असून कादवा यावर्षी अधिक कार्यक्षमतेने गाळप करणार आहे. कोणतेही उपपदार्थ निर्मिती नसताना उसाला सर्वाधिक भाव दिला असून यावर्षीही उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक उसाचा भाव (एफआरपी) कादवाची राहणार आहे’,असे आश्वासन कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.कादवा सहकारी साखर कारखान्याचे ४३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभप्रसंगी श्रीराम शेटे बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवाचे माजी चेअरमन अॅड.बाजीराव कावळे होते.
पुढे बोलताना श्रीराम शेटे यांनी गेल्या बारा वर्षातील कादवाची वाटचाल विशद केली.‘ज्यावेळी सभासदांनी कारखान्याची सत्ता दिली त्यावेळी कादवा प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीत होता.मोठी देणी बाकी होती कर्ज थकलेले होते. एकुण किमंत उणे झालेली होती.त्यामुळे कोणतीच बँक कर्ज देत नव्हती .त्यामुळे कारखाना सुरू होईल की नाही याबाबत शंका होती. मात्र अनेक सभासदांनी दोन-तीन कोटी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे कारखाना सुरू झाला.संचालक मंडळाने पारदर्शी कारभार करत योग्य नियोजन व काटकसर करत कादवा अडचणीतून बाहेर काढला असून त्यावेळचे नेटवर्थ उणे ४७७.२८ लाख होते. त्या परिस्थितीवर मात करत आजच्या परिस्थितीत नेटवर्थ अधिक १८६२.३१ लाख झाले असून, म्हणजेच त्यात २३३९.५९ लाखाने वाढ झाली आहे .त्यामुळे तोटाही भरून निघालेला आहे.
कादवाला लेखा परीक्षणात ‘अ’ वर्ग मिळाला आहे. कारखान्याची यत्रणा ५० वर्ष जुनी व पूर्णपणे कालबाह्य झाल्याने विविध यंत्रणा बदलताना त्या १२५० क्षमतेच्या न टाकता दूरदृष्टीचा विचार करून अधिक क्षमतेच्या व अत्याधुनिक टाकल्या आहे. त्यामुळे गाळप कार्यक्षमता वाढली आहे. सर्वाधिक भाव व वेळेवर पैसे अदा होत असल्याने ऊस उत्पादकांची पसंती कादवाला आहे, मात्र कमी गाळप क्षमता असल्याने गाळप मर्यादा येत होत्या. त्यामुळेच नव्याने मिल बॉयलर,टर्बाईन,ग्रेडर आदी विविध मशिनरी बदललेल्या असल्याने गाळप क्षमता वाढणार आहे. यंदा चांगला पाऊस झालेला असल्याने अधिक ऊस लागवड करणे शक्य असून जास्तीत जास्त ऊस लागवड करावी ,’असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.
यावेळी संपतराव शिवराम घडवजे, नरेश भास्करराव देशमुख, भिकनराव गोपाळराव देशमुख, कैलास भगवंत पाटील, विनायक मुरलीधर बर्डे यांंच्या हस्ते सपत्नीक गव्हाण पूजन झाले.जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील यांच्या हस्ते नवीन मिलचे पूजन करण्यात आले.मान्यवरांचे हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकण्यात आली.यावेळी माजी चेअरमन अॅड.बाजीराव कावळे, उपाध्यक्ष उत्तमबाबा भालेराव, साहेबराव पाटील,संचालक बाळासाहेब जाधव आदींची भाषणे झाली.
यावेळी मविप्रचे संचालक दत्तात्रय पाटील, सदाशिव शेळके, रा.कॉ. तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख, विलास कड, विश्वास राव देशमुख, संजय पडोळ, मधुकर गटकळ, त्र्यंबक संधान, दिनकर जाधव, विश्वनाथ देशमुख, बापू पडोळ, सुभाष शिंदे, सुनील केदार, संदीप शार्दूल, शांताबाई पिंगळ, चंद्रकला घडवजे, कामगार संचालक सुनील कावळे, संपतराव पाटील, संपतराव कोंड, विलासराव वाळके, बबनराव देशमुख, अशोक वाघ, राजेंद्र ढगे, शांताराम बार्हाते, सुनील पाटील, कचरु पाटील, डॉ.योगेश गोसावी, शाम हिरे, सुनिल शेटे, तौसिफ मनियार आदीसह सर्व संचालक, सभासद, अधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक संचालक शहाजी सोमवंशी यांनी तर सूत्रसंचालन प्रा.लक्ष्मण महाडिक यांनी केले.
गुरुकडून शिष्याला शाबासकीची थाप
कादवाचे माजी चेअरमन अॅड.बाजीराव कावळे हे विद्यमान चेअरमन श्रीराम शेटे यांचे राजकीय गुरू असून अनेक वर्षानंतर अॅड.बाजीराव कावळे हे कारखान्याचे गळीत हंगाम शुभारंभास आले होते. यावेळी बोलताना त्यांनी कारखान्याचे प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करताना आपण गेली चार पाच वर्षांपासून अहवाल बघत नाही. कारण आपल्या शिष्याने कारखाना अत्यंत सुस्थितीत सुरू ठेवला असून त्यांचेवर विश्वास आहे. कारखाना दिमाखात सुरू आहे याचा आनंद होत असल्याचे सांगत श्रीराम शेटे यांच्यासह संचालक मंडळाच्या कामकाजाचे कौतुक केले.