नाशिक । प्रतिनिधी
शहरातील २७ रिक्षा थांब्यांवरून ५४ मार्गांसाठी शेअर-ए-रिक्षा प्रवासी वाहतूक (दि. १) सुरू करण्यात आली आहे. मात्र तत्कालिन प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निश्चित केलेले भाडेदर कुणालाही परवडणारे नसल्याचे आता सिद्ध झाले आहे. सध्या रिक्षाचालक नाशिकरोड ते सीबीएस या मार्गावर प्रतिप्रवासी ३० रूपये प्रवासी भाडे आकारत असतांना शेअर रिक्षाचे हेच प्रतिप्रवासी भाडे ५८ रूपये आहे. त्यामुळे गरीबातील गरीब व श्रीमंतातील श्रीमंत हे ‘अवास्तव’ भाडे देण्यास तयार होणार नसल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले आहे.
या विचित्र धोरणामुळे शेअर रिक्षांचे प्रवासी शहर बससेवेला प्राधान्य देऊ शकतात. त्यामुळे शहर बसला अच्छे दिन येण्याची शक्यता वाढली आहे. शहरात झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात राज्य-परराज्यातून लाखो भाविक येतात. त्यांची प्रवासादरम्यान रिक्षाचालकांकडून आर्थिक लूट होऊ नये, यासाठी आरटीओकडून शेअर- ए- रिक्षा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी २७ थांब्यावरून ५४ मार्गांसाठी शेअर- ए- रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरटीओच्या नियमानुसार मुंबई, ठाणे आणि पुणे शहराच्या तुलनेत शेअर-ए-रिक्षा प्रवासी वाहतुकीसाठी नाशिक शहरासाठी सर्वाधिक भाडेदर देण्यात आला आहे.
कायदा जनतेसाठी आहे की कुणासाठी हे समजत नाहीये. अचानक रिक्षा थांबे घोषित केले. मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त व परिवहन अधिकारी यांच्या कौतुकासाठी शब्द नाहीत. हा क्रांतिकारी निर्णय आहे. आम्ही वर्षानुवर्षे थांबे मिळविण्यासाठी खेट्या मारतोय, यांनी एका दिवसात थांबे मंजूर केले. इतके भाडे असल्यावर जनता या रिक्षांत बसेल का? हा मोठा प्रश्न आहे.
भगवंत पाठक, श्रमिक सेना, जिल्हाकार्याध्यक्ष
भाडे प्रति प्रवासीच
आरटीओ, वाहतूक पोलिसांनी हे भाडे दर निश्चित केले आहेत. परंतु शेअर-ए-रिक्षाचे हे दर प्रतिव्यक्ती असे ठरविण्यात आले आहे. जेथे रिक्षा प्रवासाला २० रूपये लागतात, तेथे शेअर रिक्षाच्या प्रवाशाला ४० रूपये म्हणजे दुप्पट भाडे मोजावे लागणार आहे. त्यामुळे भविष्यात ‘नाशिककर’ या सेवेकडे कसे पाहतात, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्याचा शेअर ए रिक्षांचा दर हा कुंभमेळ्यामध्ये समितीने ठरवलेला आहे. हे दर प्रती व्यक्तीसाठीचेच आहेत. निश्चित केलेल्या मार्गांवर प्रवाशांनी मागणी केल्यानंतर रिक्षांना मिटर प्रमाणे जाणे बंधनकारक आहे. यामुळे शेअर किंवा मिटर ज्या पद्धतीने परवडेल त्या पद्धतीने नागरीक प्रवास करू शकतात. हा पब्लिक चॉईस आहे. अधिक रिक्षा मिटर प्रमाणे चालाव्यात हा आमचा आग्रह आहे.
भरत कळसकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक
शेअर रिक्षात तीन प्रवासी बसले असतील तर, त्या तिघांनी त्या मार्गावरील भाडे विभागून द्यावयाचे आहे. दोन प्रवासी असतील, तरी त्यांनी ते विभागूनच द्यायचे आहे. आरटीओने अभ्यास करून हे भाडेदर ठरविले आहेत.
पौर्णिमा चौघुले पोलीस उपायुक्त, शहर वाहतूक, नाशिक.