नाशिक | प्रतिनिधी
देशदूत कल्चर कट्टयाचे व्यासपीठ हे नवोदित तसेच व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी उत्तम उपक्रम असून छायाचित्रकार हे देखील कलाकार आहेत ही जाणीव राखल्याचे मत देशदूत कल्चरकट्टयातील छायाचित्रकारांच्या उपक्रमात मांडले गेले.
सोमवारी संध्याकाळी छायाचित्रकारांसाठीच्या झालेल्या देशदूत कल्चर कट्टयामध्ये नवोदित हौशी छायाचित्रकारांनी आपली चित्र प्रदर्शित करुन ते कसे काढले त्यातील बारकावे मांडले. उपस्थित वरिष्ठ छायाचित्रकारांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रख्यात छायाचित्रकार प्रसाद पवार, छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप, प्रवीण अस्वले, वीरू कदम, अनुराग मौर्य, सिद्धार्थ क्षत्रिय, गोपाल कुमार, व इतर उपस्थित होते.
- त्रंबकेश्वर तालुक्यातील बह्मगिरी रस्तावरील बारवचे अनुराग मौर्य यांनी टिपलेले दृश्य.
- वालदेवी धरण परिसरातील निसर्गाचे विलोभनीय रंग कॅमेर्यात टिपले प्रवीण अस्वले यांनी.
- आपल्या पिल्लांना चोचीद्वारे भरवणार्या पक्षांचे भावनीक चित्र टिपले आहे नाशिकचे छायाचित्रकार संजय जगताप यांनी.
- गोदावरी नदीत सराव करणार्या रोईंगपटूचे नाशिकचे छायाचित्रकार सिद्धार्थ क्षत्रिय यांनी कॅमेर्यात कैद केलेले मनोहारी दृश्य.
चर्चेत सहभाग घेताना छायाचित्रकारांनी काही मुद्दे उपस्थित केले. त्यामध्ये प्रामुख्याने नाशिककरांची रसिकता काहीशी लोप पावली असल्याची खंत व्यक्त केली. व्यावसायिक आणि हौशी छायाचित्रणातील फरक समजावून सांगत असताना प्रसार माध्यमांनी आमच्यातील रसिकतेला अधिक पुढे आणले असल्याचा सूर चर्चेत उमटला. असले. छायाचित्रकार आज समाज बदलाचे प्रभावी माध्यम बनू शकतो. मात्र त्यासाठी स्वतंत्र व्यासपीठाची गरज असून देशदूतच्या माध्यमातून ही गरज पूर्णत्वास येत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
शहरात असलेल्या सहा हजारपैकी चार हजार छायाचित्रकार व्यावसायिक असून उरलेले हौशी व इतर सदरात मोडतात. मात्र या सर्वांची एकत्र मोट बांधल्यास एकमेकांच्या अनुभवातून या क्षेत्रात नव्याने येऊ पाहणार्यांना योग्य मार्गदर्शन करता येईल, असेही मत व्यक्त झाले. यावेळी काही छायाचित्रकारांनी त्यांनी काढलेली छायाचित्रे दाखवून त्यावर त्यांनी केलेला विचार, प्रकाश, वेळ ते चित्र काढण्यासाठी लागणारे ज्ञान, अभ्यास या बाबत चर्चा केली तर तंज्ञानी याबबत मार्गदर्शन केले.