नाशिक । प्रतिनिधी
राज्य परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात येणार्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता या प्रक्रियेला दहा डिसेंबरपर्यंत दुसर्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. परिषदेकडून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले त्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरू आहे. त्यात एक वेळा मुदतवाढ देत ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली. त्यानंतर पुन्हा परिषदेने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. नवे वेळापत्रक वेबसाइटसह शाळांना पाठविण्यात आले.
नव्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना दहा डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येतील. इयत्ता पाचवी, विद्यार्थ्यांना शाळांच्यामार्फत अर्ज भरावे लागतात. मात्र, राज्यातील शाळांकडून प्रतिसाद कमी मिळतो आहे. तसे लक्षात आल्यानंतर शिक्षण विभागाने शाळांना आवाहनही केले. शाळांमधील बहुतांशी विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत, त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांना देण्यात आल्या. सरकारी शाळांबाबतही आदेश काढत त्याबाबत बैठका घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.
सुधारित वेळापत्रक
नव्या वेळापत्रकाप्रमाणे नियमित १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येतील. विलंब शुल्कासह ११ डिसेंबर ते १७ डिसेंबर, अतिविलंब १८ ते २४ व अति विशेष विलंब शुल्कासह २५ ते ३१ डिसेंबर दरम्यान अर्ज भरता येतील, असे आयुक्त तुकाराम सुपे यांनी स्पष्ट केले आहे. ३१ डिसेंबरनंतर कुणालाही ऑनलाइन वा ऑफलाइन अर्ज भरता येणार नाही.