Saturday, May 4, 2024
Homeनाशिक९३७० हेक्टर द्राक्ष क्षेत्राची निर्यातीसाठी नोंदणी; लांबलेला परतीचा पाऊस, ढगाळ हवामानाचा फटका

९३७० हेक्टर द्राक्ष क्षेत्राची निर्यातीसाठी नोंदणी; लांबलेला परतीचा पाऊस, ढगाळ हवामानाचा फटका

नाशिक । विजय गिते

द्राक्ष पंढरी समजल्या जाणार्‍या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी द्राक्षाचे उत्पादन,गुणवत्ता व दर्जा यात नेहमीच अव्वल राहण्याचा मान कायम ठेवला आहे.त्यामुळे नाशिकची द्राक्ष जगभर प्रसिद्ध आहेत. पुढील हंगामातदेखील द्राक्षाची चव परदेशातील आपल्या पाहुण्यांना चाखता यावी, यासाठी नाशिकच्या द्राक्ष उत्पादकानी त्यादृष्टीने प्रयत्न सुरू ठेवलेच आहेत.

- Advertisement -

आपली द्राक्षे परदेशात पाठविण्यासाठी द्राक्ष उत्पादकांना द्राक्ष निर्यातीच्या कक्षा रुंदावत ठेवण्यात यशही येत आहेत. मात्र, यावर्षी लांबलेला परतीचा पाऊस आणि त्यानंतर आलेले ढगाळ हवामान याचा सामना द्राक्ष उत्पादकांना करावा लागत आहे. अशाही परिस्थितीत जिल्ह्यातून आतापर्यंत ९३७० हेक्टर क्षेत्रावरील १४५६६ प्लॉटची द्राक्ष उत्पादकांनी निर्यातीसाठी नोंदणी केली आहे.

जागतिक पातळीवर हंगामातील पहिली द्राक्षाची निर्यात ही जिल्ह्यातील कसमादे या भागातूनच होते. हा भाग पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादनात आघाडीवर आहे. मात्र, यावर्षी अतिवृष्टीमुळे सटाणा, देवळा, मालेगाव, कळवण या तालुक्यांमध्ये पूर्वहंगामी द्राक्षाना तडे जाणे, घडकुज होणे, अशा कारणामुळे या भागातील निर्यातक्षम द्राक्ष गुणवत्तेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. परिणामी ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार्‍या देशातील पहिल्या द्राक्ष निर्यातीला याचा फटका बसला.

कसमादे भागातून पहिला द्राक्ष निर्यातीला शंभर रुपये तर कधी दोनशे रुपये प्रतिकिलो असा घसघसशीत दर नेहमीच मिळत आलेला आहे.निर्यातक्षम द्राक्ष बागेचे नियोजन करण्याकरिता या भागातील द्राक्ष उत्पादकांनी आपले कौशल्य विकसित केलेले आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत देशाला परकीय चलन देण्यात या भागातील द्राक्ष उत्पादकांचा खारीचा वाटा राहिलेला आहे. मात्र, यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी द्राक्ष निर्यात अजूनही खोळंबलीच आहे.

यामुळे परदेशी बाजारात उपलब्ध होणार्‍या द्राक्षांमध्ये भारतीय द्राक्षांचीं उणीव यामुळे भासणार आहे. पावसाने द्राक्ष निर्यातीचे संपूर्ण गणित कोलमडले आहे. प्रामुख्याने रशिया व दुबई मार्केटला प्रचंड मागणी असताना या भागातून द्राक्ष पाठवता येत नसल्याबद्दल कसमादे पट्ट्यातील द्राक्ष उत्पादकांनी चिंता व्यक्त केली आहे.

निर्यात घटली
कसमादे मधील काही ठिकाणचा द्राक्षमाल काढण्यासाठी आला आहे. परंतु, अपेक्षित निर्यातक्षम माल उत्पादित होत नसल्यामुळे मागणी असूनही माल पाठवता येत नाही. श्रीलंका,रशिया येथे अनुक्रमे एक व नऊ असे दहा कंटेनरची निर्यात झालेली आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत तब्बल ९९ टक्कयाने ऑक्टोबर महिन्यातील निर्यात घेटलेली आहे. मागील वर्षी आतापर्यंत ऑक्टोबरमध्ये १९४ मेट्रिक टन तर नोव्हेंबर महिन्यामध्ये २७२३ मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली होती.

नाशिक जिल्ह्यामधील मागील चार वर्षांमध्ये द्राक्ष निर्यात

द्राक्ष प्लॉट नोंदणी संख्या

सन २०१५-१६ (२५ हजार २४८),सन २०१६-१७(३४ हजार ११०), सन २०१७-१८(३०हजार ४२७),सन २०१८-१९(३८ हजार ४७६).

द्राक्ष प्लॉट नोंदणी क्षेत्र हेक्टरमध्ये

सन २०१५-१६(१७ हजार १०३),सन २०१६-१७( २२ हजार१५४.), सन २०१७-१८ (१९ हजार ३६८),सन २०१८-१९ (२४ हजार६२५).

निर्यात मेट्रिक टनमध्ये

सन २०१५-१६.(एक लाख ११ हजार ७६),सन २०१६-१७( एक लाख ९८०),सन २०१७-१८ (एक लाख २ हजार ८१६),सन २०१८-१९ एक लाख ४६ हजार ११३).

- Advertisment -

ताज्या बातम्या