दहा हजार रुपये वेतन वाढ , २३० कामगार करणार कायम
सातपूर । प्रतिनिधी
कोरोनामुळे उद्योगांची गती मंदावली असून कामगारांवर आसमानी संकट कोसळले असतांना सातपूरच्या बॉश कंपनी व्यवस्थापन व अंतर्गत कामगार संघटना यांनी वेतन वाढीचा करार करुन कामगारांसह उद्योग जगताला सुखद धक्का दिला आहे.
मागील ४० महिन्यांपासून बॉश कंपनीत वेतनवाढ करार प्रलंबित होता. दीड महिन्यांपूर्वी नव्या युनियन पदाधिकाऱ्यांनी कराराची बोलणी पुढे सुरु ठेवली.कंपनीचे स्थानिक व्यवस्थापन आणि युनियन पदाधिकारी यांच्यात सकारात्मक बोलणी झाल्यानंतर रविवारी उभयपक्षांनी अंतिम करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या करारानुसार साडेसात हजार रुपये वेतनवाढ आणि सात टक्के उत्पादन वाढ दिल्यानंतर अडीच हजार (व्हेरिएबल बास्केट) असे दहा हजार रुपये दरमहा कामगारांना मिळणार आहेत. आणि सीपीआयडी लिंकिंगचे ३ हजार रुपये वेगळे मिळणार आहेत.दि.१ जानेवरी २०१७ रोजी हजेरी पटावर असलेल्या सर्व कायम कामगारांना ही वेतनवाढ मिळणार आहे.शिवाय दि.३ मे पासून १३० हंगामी कामगार कायम होणार असून पुढील सहा महिन्यात उर्वरित १०० हंगामी कामगार कायम केले जाणार असल्याचे युनियनचे अध्यक्ष अरुण भालेराव यांनी सांगितले.
या करारावर कंपनीचे उपाध्यक्ष अनंतरामन, उपाध्यक्ष मुकुंद भट, एचआर महाव्यवस्थापक श्रीकांत चव्हाण तसेच सतीश कुमार, जतीन सुळे, तमाल सेन, शरद गीते तर युनियनच्यावतीने अध्यक्ष अरुण भालेराव, सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी, उपाध्यक्ष भाऊसाहेब बोराडे, नितीन बिडवाई, सहचिटणिस हरिभाऊ नाठे, विनायक येवला, खजिनदार नंदू अहिरे, कौन्सिल सदस्य पांडुरंग खोटरे, शैलेश बैरागी, प्रशांत गुरुळे, योगेश चव्हाण, संजय पवार, अनिल देवरगावकर, अतुल कुमावत आदिंनी स्वाक्षऱ्या केल्या.
या करारानुसार कामगारांना दरमहा दहा हजार रुपये वेतनवाढ मिळणार आहे.तर अशा संकट काळातही २३० हंगामी कामगारांना कायम करण्याचा हा ऐतिहासिक करार असल्याची माहिती बॉश युनियनचे अध्यक्ष अरुण भालेराव सरचिटणीस श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.