नाशिक । प्रतिनिधी
उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू असल्याने राज्यात आलेल्या थंडीच्या लाटेचा मुक्काम वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूरसह विदर्भात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यानंतर राज्यात मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात पारा घसरला आहे.
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर आणि चंद्रपूर येथे सर्वात कमी १०.१ अंश तापमानाची नोंद झाली, तर नाशिक व नगर जिल्ह्यात पारा १०.६ अंशावर आला आहे. धुळे जिल्ह्यात पारा ६ अंशापर्यत खाली आला आहे. महाराष्ट्रातील पारा पुन्हा १० अंशांपर्यत खाली आल्याने मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. गार वारे आणि ढगाळ वातावरणामुळे दिवसभर थंडीचे वातावरण टिकून असल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
वेधशाळेने आज निच्चांकी किमान तापमानाची नोंद पंंढरपूर व चंद्रपूर याठिकाणी झाली आहे. धुळे जिल्ह्यात ६ ते ७ अंश इतका निच्चांकी किमान तापमानाची नोंद झाल्याने राज्यात काल सर्वात थंड जिल्हा म्हणून त्यांची नोंद झाली. त्याखालोखाल नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात पारा १० ते ११ अंश तापमानाची नोंद झाली , नाशिक व महाबळेश्वर याठिकाणी १०.६ अंश सारखी नोंद झाली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील पारा ११ ते १२ अंशावर दरम्यान असल्याने आणि आर्द्रता ८० ते ९० टक्क्यापर्यत गेल्याने गारठा होता. यात धुळे याठिकाणी पारा सर्वात ७ अंश, जळगाव ११मालेगाव ११.८ अशा किमान तापमानाची नोंद झाली.
राज्यात पुणे ११.७, औरंगाबाद १०.६, बुलडाणा व अकोला १०.२, गोंदिया १२.२, बीड १३.२, नांदेड १४, सातारा १४.६, सोलापूर १६.५, नागपूर, वाशिम १२ अशाप्रकारे किमान तापमानाची नोंद झाली. या तापमानातील बदलानंतर आज पुन्हा नाशिकचा पारा खाली आला.
काल पहाटे आर्द्रता थेट ८७ टक्के झाल्याने दाट धुक्क्याची चादर बघायला मिळाली. यामुळे पहाटे महामार्गासह राज्य मार्गावर वाहतुकीवर व रेल्वेवर परिणाम झाला. पाराखाली आल्याने जिल्ह्यातील द्राक्ष, इतर फळबागा व भाजीपाल्यावर परिणाम जाणवू लागला आहे.