नाशिक । प्रतिनिधी
सुरत (गुुजरात) याठिकाणी कोचिंग क्लासेसला आग लागुन विद्यार्थ्यांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात अशी घटना घडू नये म्हणुन महपालिका अग्निशमन दलाकडून शहरातील कोचिंग क्लासेसला नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. यानंतर बहुतांशी क्लासेसने अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला घेतला असुन शिल्लक राहिलेल्या ५६ क्लासेसला आता महापालिकेकडुन अंतिम नोटीसा पाठविण्यात आल्या आहे.
सुरत येथील क्लासला लागलेल्या आगीत चौदा विद्यार्थी मरण पावले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडुन तातडीने शहरातील क्लासेसचा सर्वे करण्यात आल्यानंतर यात बहुतांशी क्लासेस हे बेकायदा असे निवासी इमारतीत सुरु असल्याचे समोर आले होते. याठिकाणी अग्निशमन प्रतिबंधक उपकरणे नसल्याचे आणि विद्यार्थ्यांना पाणी व स्वच्छता गृह नसल्याचे समोर आले होते. तसेच काही व्यापारी संकुलात देखील क्लासेसच्या जागेत हे उपकरणे आणि सेवा सुविधा नसल्याचे समोर आले होते.
या एकुणच प्रकारानंतर प्रशासनाने शहरातील ३१९ क्लासेसला नोटीसा पाठवून या उपाय योजना करुन घेऊन अग्निशमनचा ना हरकत दाखला घेण्यासाठी मुदत दिली होती. या दिलेल्या मुदतीत २६३ क्लासेस चालकांनी अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणा व सेवा सुविधा उपलब्ध करुन देऊन यासंदर्भातील ना हरकत दाखल घेतला आहे. मात्र अजुनही ५६ जणांनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना अंतीम नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसीची मुदत संपल्यानंतर संबंधीत क्लासेसचा पाणी पुरवठा व वीज पुरवठा कट केला जाणार आहे.