Wednesday, May 29, 2024
Homeनाशिकजि.प.अध्यक्ष,पदाधिकार्‍यांकडून ऋण व्यक्त; आभार व्यक्त करण्याचा अभिनव पायंडा

जि.प.अध्यक्ष,पदाधिकार्‍यांकडून ऋण व्यक्त; आभार व्यक्त करण्याचा अभिनव पायंडा

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्षांसह विषय समिती सभापतींचा अडीच वर्षांचा कार्यकाळ सरत्या वर्षासोबतच बुधवारी(दि.१) संपुष्टात आला.दरम्यानच्या काळात प्रशासन प्रमुखांवर अविश्वास दाखविण्याची वेळ समीप येऊनही सर्वांनी एकत्र येत विभागप्रमुख व अधिकार्‍यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केे.ले.पद सोडत असतानाच आपल्या सहकार्‍यांचे अभिनंदन करत आभार मानण्याचा हा अभिनव पायंडा यानिमित्ताने पदाधिकार्‍यांनी घालून दिला आहे.अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या दालनात हा कृतज्ञता सोहळा बुधवारी (दि.१) पार पडला.

- Advertisement -

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला.काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेच्या शीतल सांगळे अध्यक्षपदी विराजमान झाल्या.त्यांच्या कार्यकाळात त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कल येथे नवीन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला.तसेच जिल्हा परिषद सेस निधीतून मतदारसंघातील नाभिकांना खूर्ची वाटप करण्याची अभिनव संकल्पना अध्यक्षा सांगळे यांनी राबवली.सर्वच सदस्यांनी या योजनेचे अनुकरण केले. प्राथमिक शाळेला संरक्षण भिंत बांधण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण केल्यामुळे यापुढे त्याआधारे खर्च शक्य होणार असल्याचे समाधान अध्यक्षा सांगळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

उपाध्यक्ष नयना गावित यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन विभाग होता . त्यांनी शेतकर्‍यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी एक लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यासाठी चालू आर्थिक वर्षात ८० लाख रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले.अर्थ व बांधकाम सभापती मनिषा पवार यांनी सांगितले की,आपण नवीन इमारतीच्या मंजूरीसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला.यात अनेक अडचणीही आल्या.मात्र,त्या सोडवण्याची तत्परता दाखवल्यामुळे आपल्या कार्यकाळात या इमारतीचे भूमिपूजन झाले.यामुळे आपण समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिव्यांगांचा निधी खर्च केला.जिल्हा परिषद इमारतीमध्ये लिफ्ट बसवण्याची परवानगी समितीने दिली. घरकुलांचे प्रश्न मार्गी लावण्यात यश आल्याचे सांगितले. महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर यांनी आपल्या कार्यकाळात कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचे समाधान व्यक्त केले.

अध्यक्ष,उपाध्यक्षांसह पवार व खोसकर या दोन सभापती अशा चार महिला प्रथमच जिल्हा परिषदेत निवडूण आलेल्या असताना त्यांनी उत्तमप्रकारे कार्यभार सांभाळला.पक्षभेद विसरुन एकत्रितपणे काम केले. या कार्यकाळात अधिकार्‍यांनी उत्तम प्रकारे सहकार्य केल्याची भावना पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस.,अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे,रवींद्र परदेशी, डॉ.विजय डेकाटे, दीपक चाटे,महेश बच्छाव,डॉ.वैशाली झनकर आदी उपस्थित होते.
.
अडीच वर्षांच्या कार्यकाळात नवीन प्रशासकीय इमारतीला मंजूरी मिळाल्याचा आनंद वाटतो. तसेच शाळांना संरक्षण भिंत, नाभिक बाधवांना खूर्ची व जिल्हा परिषदेला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याचे समाधान वाटते. यापुढेही नागरिकांची सेवा अविरत करतच राहणार आहे.
-शीतल सांगळे, अध्यक्षा (जिल्हा परिषद)

- Advertisment -

ताज्या बातम्या