लासलगाव | वार्ताहर
सध्या उंच दराने विक्री होत असलेला कांदा देशावरील बाजारपेठेत ट्रकने पाठविला जात असताना रस्त्यातच ट्रक चालकाची मोठ्या रकमेचा कांदा पाहून नियत बदलल्याने नियोजित ठिकाणी न देता परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की लासलगाव हुन दिल्ली येथे नसीरपुर येथे पाठविलेला गेलेला ११ लाख ५३ हजार नऊशे रूपयांचा १८ टन कांदा मालट्रकने पाठविला असता तो नियोजित व्यापारीयांच्या कडे न पोहचवता परस्पर ठकबाजीने व फसवणुकीचा हेतु ठेवीत गहाळ केल्याबद्दल ट्रान्स्पोर्ट मालक,चालक व क्लिनर यांच्या विरोधात लासलगाव पोलिस कार्यालयात गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिक येथील कांदा व्यापारी सचिन सतिष परदेशी यांनी विंचूर येथील उपबाजारातून ११ लाख ५३ हजार रूपयांचा १८ टन कांदा खरेदी केला आणि ३० किलो वजनाच्या कांदा गोणी मध्ये पैकिंग करून तो नाशिक येथील आडगाव येथील न्यु दिल्ली शिखर रोडवेजचे मालक बाबुलाल उर्फ गोपालस्वामी यांच्या मार्फत मालट्रक क्रमांक एचआर ७४ ए १७२५ ने चालक नुरमोहंमद आरीफ यांच्या व अनोळखी क्लिनर यांच्या ताब्यात देऊन तो दिल्ली येथील नसिरपुर येथे दि.१७ डिसेंबर रोजी पाठविला परंतु तो ठकबाजी करीत कांदा पोहचविला नाही अशी फिर्याद कांदा व्यापारी यांनी लासलगाव पोलिस कार्यालयात दिली.
या प्रकरणी भादंवा कलम ४२०,४०६ व ३४ नुसार न्यु दिल्ली शिखर रोडवेजचे मालक बाबुलाल उर्फ गोपालस्वामी , मालट्रक चालक नुरमोहंमद आरीफ व अनोळखी क्लिनर यांच्या विरोधात गुन्हा दाखल असुन सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आर.एस.सोनवणे करीत आहेत.