Friday, May 3, 2024
Homeनाशिकआता एक सीटवर एकच प्रवासी; ‘करोना’रोखण्यासाठी एसटी महामंडळाचा निर्णय

आता एक सीटवर एकच प्रवासी; ‘करोना’रोखण्यासाठी एसटी महामंडळाचा निर्णय

नाशिक । प्रतिनिधी

‘करोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळामार्फत उपाययोजना सुरू आहेत. महामंडळाने आता प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेत बदल केला असून एका सीटवर एकच प्रवासी बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

‘करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महामंडळामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. त्यानंतर महामंडळाने आता प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवून प्रवास करण्याच्या दृष्टीने काही आसने बैठक व्यवस्थेसाठी बंद राहणार आहेत.

बसमध्ये प्रवासी एक सीट सोडून बसवण्यात येणार आहे. यामुळे बसमधील काही आसने रिकामी राहणार आहेत. प्रवाशांची संख्याही कमी राहणार आहे. या निर्णयामुळे पन्नास टक्के वाहतूक होईल. गर्दी टाळण्यासाठी उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. महामंडळाच्या या निर्णयाची नाशिक विभागाने अमलबजावणी सुरू केली आहे. या निर्णयानुसार एका बसमध्ये किमान पन्नास टक्के प्रवासी बसवण्यात येत आहेत. महामंडळाच्या या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

दरम्यान, ‘करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महामंडळाने याआधीच उपाययोजना सुरू केल्या आहेत. बसस्थानकांची नियमित साफसफाई करणे, चालक व वाहकांना मास्क वाटप, या आजाराबाबत प्रवाशांना योग्य माहिती व्हावी यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यानंतर आता गर्दी कमी करण्यासाठी एका सीटवर एक प्रवासी असा निर्णय घेण्यात आला आहे.

यापुढे देखील करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एसटीकडून उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती एसटीचे महाव्यवस्थापक राहुल तोरो यांनी दिली आहे.

’करोना’बाबत नागरिकांकडूनही काळजी घेण्यात येत आहे. प्रवास करणे टाळले जात आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होत आहे. प्रवासी कमी असल्याने महामंडळाने काही बस फेर्‍या कमी केल्या आहेत. नगर जिल्ह्यातून पुण्यास जाणार्‍या प्रवाशांची संख्या जास्त आहे. रोज हजारो प्रवासी पुण्यास जातात. सध्या मात्र नागरिकांनी प्रवास करणे टाळले आहे. त्यामुळे नगर विभागानेही काही फेर्‍या कमी केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या