नाशिक । प्रतिनिधी
शहर बसवाहतुकीच्या मुद्यावर महापालिकेत कलगीतुरा रंगलेला असताना विविध बसथांब्यांच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली असल्याचे चित्र आहे. सातपूर रस्त्यावरील असणारे थांबे केवळ नावाला असून ऊनपाऊस अंगावर घेत प्रवाशांना बसच्या प्रतीक्षेत उभे राहावे लागत आहे.
शहरातील अन्य भागातदेखील बसथांब्यांची हीच अवस्था असून शालिमारसारख्या वर्दळीच्या भागात खासगी वाहनांच्या गराड्यात बसथांबे हरवून गेल्याचे दिसते. सातपूर रस्त्यावरील बांधकाम भवन, सिबल हॉटेल, पंचायत समिती, वेद मंदिर, जलतरण तलाव, ईदगाह मैदान, होली क्रॉस चर्च, व शालिमार येथील शहर बस वाहतुकीच्या थांब्यांची अवस्था अतिशय वाईट असून केवळ नाईलाज म्हणून प्रवाशांना तिथे उभे रहावे लागत आहे.
यातील बहुसंख्य थांब्यांचे केवळ सांगाडे अस्तित्वाला असून तिथे थांबणे म्हणजे प्रवाशांच्या जीवावर बेतणारे आहे. छताचे पत्रे उडालेले, बसायची बाके गायब झालेल्या या थांब्यांवर प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. मात्र त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एसटी महामंडळ अथवा महापालिका प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ नसावा हीच शोकांतिका आहे. या बसथांब्यांची तातडीने दुरुस्ती करावी किंवा त्यांचा धोकादायक भाग तातडीने हटवण्याची गरज असून लोकप्रतिनिधींनी देखील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.