Monday, November 18, 2024
Homeनाशिक#HappyNewYear : नवे वर्ष, नवा संकल्प स्वप्न जिद्दीचे नवप्रेरणेचे…

#HappyNewYear : नवे वर्ष, नवा संकल्प स्वप्न जिद्दीचे नवप्रेरणेचे…

नाशिक | प्रतिनिधी 

आजपासून नववर्षाला प्रारंभ झाला. गेल्या वर्षांत काही स्वप्न अर्धवट राहिले असेल तर ते यंदाच्या वर्षांत पूर्ण करावयाचेआहे. आरोग्यावर लक्ष केंद्रित करावयाचे आहे. सामाजिक बांधिलकी जपायची आहे. सिव्हिक सेन्स पाळायचे आहेत. समाजात चुकीच्या ज्या गोष्टी होत आहेत त्याच्याविरुद्ध एकवटायचे आहे. असे अनेक संकल्प नववर्षांच्या प्रारंभी अनेकांनी केले आहेत.

- Advertisement -

नवीन वर्षात खूप चांगले काम करणार आहे.आरोग्याच्या दृष्टीने विशेष लक्ष देईल.बदलेल्या वातावरणामुळे सगळीकडे अडचणीचा सामना करावा लागतो. यामुळे वृक्षारोपणाचे काम मी नव्या वर्षात करेल. वृक्षारोपणाची सुरुवात मी माझ्या घरापासून करणार असून नाशिकसह अनेक ठिकाणी पावसाळ्यात वृक्षारोपणाला जाण्याचा माझा मानस आहे. अनेक प्रोजेक्ट माझी वाट बघत आहेत त्यादृष्टीने यंदाच्या वर्षात मी खूप चांगले काम करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल.
सायली संजीव, आटपाडी नाईट्स फेम अभिनेत्री

माझे २०१९ हे वर्ष खूप नाराजीचे गेले, माझ्या हातातून खूप गोष्टी गेल्या. मात्र, येणार्‍या नव्या वर्षात मी खूप मेहनत करणार आहे. मला या वर्षांत खूप कष्ट घेऊन नावलौकिक मिळवायचा आहे. माझ्या वैयक्तित जीवनात आनंद नांदावा यासाठी मी खर्‍या अर्थाने प्रयत्न करणार आहे. मला नाती जोडायला आवडतात, यासाठी मी प्रयत्न करेल. माणुसकी जपेल, माझ्या हातून सामाजिक कामे होतील यासाठी मी कटिबद्ध असेल. अनेकांना माझ्या परीने मी मदत करणार आहे, इतरांनाही माझ्या या कामात सहभागी करून घेणार आहे.
प्रांजली उदावंत

माझा नवीन वर्षाचा संकल्प हा आहे की, मला गाण्याची आवड असल्या मुळे ह्या वर्षी गाण्यात जास्तीत जास्त प्रगती करायची आहे. मी जिथे नोकरी करते तिथे चांगल्यारीतीने यश प्राप्त करायचे आहे.
मुग्धा अभय जोशी

’लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे’असे म्हणतात. मीदेखील नववर्षाच्या निमित्ताने रात्री बारावाजेच्या आत झोपण्याचा व सकाळी सात वाजेच्या आत उठण्याचा संकल्प केला आहे.
गणेश सोनवणे

सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना सर्वांनीच संकल्प करायला हवा, तो दुस-यांच्या जीवनात आनंदाचे मळे फुलविण्याचा. स्वत:पुरतंच पाहण्याची वृत्ती सोडण्याचा आणि अधिक व्यापक अवकाशाची ओळख करून घेण्याचा…आपल्या आयुष्याच्या वाटचालीत साथ-सोबत करणारे सगेसोयरे, आप्तस्वकीय, आपल्याशी प्रत्यक्ष संबंध आला नसला तरी ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाने, कार्यकर्तृत्वाने आपल्याला प्रभावित केलेले असते असे अनेकजण हे जग सोडून गेलेले असतात. नव्या वर्षात त्यांची सोबत नसणार, ही अपरिहार्यता स्वीकारणे आपल्याला जड जाते. पण वास्तवाला सामोरे जावेच लागते.
मृणाल पाटील

मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे; त्या अनुषंगाने मी माझ्या हातून जास्तीत जास्त सामाजिक कार्य कसे घडेल यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. अनाथ बालकांना मदतीचा हात देऊन त्यांना मायेचा निवारा कसा मिळेल याकडे जास्त लक्ष देणार आहे. याक्षेत्रात खूप धावपळ आणि दगदग असते याची जाणीव असल्याने व्यायामाकडे जास्त लक्ष देणार आहे.जास्त संकल्प केले तर बरेचसे पूर्णत्वास जात नाहीत असा अनुभव सर्वांनाच येतो म्हणून हे दोनच संकल्प येत्या वर्षात पूर्ण करणार आहे.
प्रणाली जयराम पिंगळे, मखमलाबाद,नाशिक

संकल्प अनेक केले जातात पण ते थोडेच दिवस आपण पाळतो. पण मी संकल्प जो केला आहे तो मी कायम करणार आहे. नवीन वर्षात मी आरोग्याकडे लक्ष देणार आहे, आर्थिक नियोजनाकडे लक्ष देणार. नेहमीप्रमाणेच समाजासाठी आपलेही थोडे योगदान देण्याचा प्रयत्न करणार आणि केलेले संकल्प पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केलेला आहे. नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा.
प्रणिता तपकिरे

नवीन वर्ष म्हणजे एक संधीच असते स्वतःलाच नवीन आव्हानांसाठी प्रेरित करण्याची! नवीन वर्षात मी नक्कीच काही संकल्प केले आहेत. त्यापैकी एक महत्वाचा आणि सर्वमान्य संकल्प म्हणजे व्यायाम! शारीरिक दृष्ट्या आपण फिट असू तर मानसिकदृष्ट्याही आपण खंबीर असतो म्हणून जिम जॉईन करणार आहे. दुसरे म्हणजे पर्यटन केल्याने ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यास मदत होते शिवाय माहितीतही भर पडते. म्हणून जास्तीत जास्त ठिकाणांना भेटी देणार आहे. याव्यतिरिक्त एका स्वातंत्र्यपूर्व ऐतिहासिक कादंबरीचे लेखन चालू आहे, कंटाळा न करता ती पूर्ण करून तिच्या प्रकाशनासाठी प्रयत्न करणार आहे.
प्रशांत रामराव पाटील.

संकल्प हा केवळ करायचा म्हणून न करता त्याकडे एक संधी म्हणून पाहावे. तो आपल्या सोबतच समाजासाठी सुद्धा उपयोगी पडावा यासाठी प्रयत्नशील असावे.
पवन बोरस्ते.

अनेकदा नवीन वर्षातला संकल्प हा केवळ काही दिवसापुरताच मर्यादित राहतो. याला कारण म्हणजे मुळात संकल्प हा केवळ एक फॅड म्हणून आजकालच्या रुजू होताना दिसून येतो. मात्र आपले ध्येय गाठण्यासाठी केवळ काही दिवसापुरत मर्यादित न रहाता पूर्ण होईपर्यंत मेहनत केली पाहिजे.
प्रियंका जाधव

नवीन वर्षाचा विचार करत असताना वर्षभरात आपण काय गमावलं यापेक्षा आपण काय कमावलं या दृष्टिकोनातून आपण सरलेल्या वर्षाकडे बघितले तर आगामी काळासाठी या आठवणी निश्चित प्रेरणादायी असतील यात कुठलीही शंका नाही. 2019 वर्ष हे महाराष्ट्र साठीच नवे संपूर्ण भारतासाठी विविध घटनांनी नाट्यमय असे वर्ष दिसून आलं या सर्व वातावरणामध्ये आपण स्वतःचा शोध घेत असताना आगामी काळात नियतीने आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची शाश्वती कोणालाही देता येणार नाही, मात्र येणार्‍या या परिस्थितीला आपण खंबीरपणे सामोरे जाऊ हे मात्र निश्चित.
नितीन तुरनर

२०२० हे वर्ष माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं असं वर्ष असणार आहे. खूप काम आणि नवीन प्रोजेक्ट्सनी भरलेले हे वर्ष आहे. या वर्षात माझा एक सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच वर्षात फेब्रुवारीत माझं लग्न देखील आहे.त्यामुळे प्रोफेशनली हे वर्ष खूप कामांनी आणि एनर्जेटिक आहे. त्याचप्रमाणे पर्सनली पण खूप आनंद देणार असं असणार आहे. त्यामुळे एक असा संकल्प नाही अनेक गोष्टी ठरवल्या आहेत त्या नवीन कामांमधून पूर्ण करेन.
पूजा श्रीराम गोरे, अभिनेत्री

नववर्षाच्या निमित्ताने काहींचे संकल्प काळ्या दगडावरील रेघेप्रमाणे असतात. हे लोक आपले संकल्प कृतीतही आणतात आणि आणायलाचं पाहिजे. त्यांचे सकारात्मक संकल्प एक दोन दिवसांसाठी नव्हे तर वर्षानुवर्षे पाळली जातात. मग त्यांची प्रेरणा घेऊन आपणही यावर्षी काही सकारात्मक संकल्प करूया आणि ते पाळूयाही. माझा संकल्प नकारात्मक गोष्टींचा त्याग करून सकारात्मक गोष्टींकडे लक्ष्य केंद्रित करणे तसेच सर्व प्रियजनांचे जीवन अधिक समृद्ध व अर्थपूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न करणे आणि स्त्री पुरुष समानता व भेदभाव विरहित जीवन जगणे.
रणजित चिंधू पवार, शांतीनगर, मखमलाबाद, नाशिक.

नवे वर्ष म्हणजे नव्या संधी, नवी उमेद आणि नवीन संकल्प परंतु हा संकल्प वर्षभर टिकून राहण्यासाठी संयम ,जिद्द ही लागतेच. गरजेचं नाही की संकल्प दरवेळी मोठाच असावा, लहान लहान संकल्पही अनेकदा आपल्या साठी व आपल्या प्रियजनासाठी उपयोगी पडतात. जे आपल्या आयुष्याला एक सकारात्मक दृष्टिकोन देतात.
प्राची कारले

या नवीन वर्षाचा माझा संकल्प: दिवसातील चारही आहार- नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण घरी आणि स्वतः बनवून खायचे! थोडक्यात काय, आळस ही टळणार, पोषक खाणार आणि रोज रोज नवनवीन पदार्थ ही बनवणार
सायली जाधव, नाशिक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या