नाशिक । प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक 2019 याकरिता महापालिका नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या दोन जागांवर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेली नाशिक महापालिकेची पोटनिवडणूक उद्या (दि.9) रोजी होत आहे. मतदान व मतमोजणीकरिता 520 अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्याचबरोबर मतमोजणीसाठी महापालिका यंत्रणा सज्ज झाली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रभाग 22 मधील भाजपा नगरसेविका सरोज अहिरे आणि प्रभाग 26 मधील शिवसेना नगरसेवक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढलेल्या सरोज अहिरे या विजयी झाल्या, मनसेनेकडून निवडणूक लढलेले दिलीप दातीर यांचा पराभव झाला होता.या महापालिकेतील दोन जागा रिक्त झाल्याने याकरिता राज्य निवडणूक आयोगाने गेल्या 9 डिसेंबर 2019 रोजी पोटनिवडणूक जाहीर केली होती.
याकरिता गेल्या 16 डिसेंबर 2019 पासून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर विविध पक्ष व अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अंतिम उमेदवारांचा सुरू असलेला प्रचार काल सांयकाळी संपला. आता याकरिता उद्या (दि.9) रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यत मतदानप्रक्रिया पार पडणार आहे. याकरिता 90 मतदान केंद्रावर प्रत्येक 5 अधिकारी कर्मचार्याचे पथक याप्रमाणे 450 जण काम करणार आहे.
तसेच दि.10 जानेवारी 2010 रोजी सकाळी10 वाजेपासून 20 टेबलवर 3 कर्मचारी याप्रमाणे 60 कर्मचार्यांकडून दोन ठिकाणी मतमोजणी होणार आहे. याकरिता 10 क्षेत्रिय अधिकारी काम पाहणार आहे. यात प्रभाग 22 मध्ये 14 हजार 753 महिला आणि 15 हजार 412 पुरुष असे एकूण 30 हजार 165 मतदार आपला हक्क बजावणार आहे. तर प्रभाग 26 मध्ये 13 हजार 821 महिला आणि 19 हजार 59 पुरुष असे एकूण 32 हजार 880 मतदार आपला हक्क बजावणार आहे.
प्रभाग 22
गुरुवारी (दि. 9) होणार्या पोटनिवडणुकीचा प्रचार काल सायंकाळी थांबला असून एका जागेसाठी 8 जण रिंगणात आहेत.भाजपच्या नगरसेविका सरोज अहिरे यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान राजीनामा देऊन राष्ट्रवादीकडून उमेदवारी केली व त्यात त्या विधानसभेवर पोहोचल्या. त्यामुळे सदरची जागा रिक्त झाल्याने पोटनिवडणूक होत आहे. महाविकास आघाडीचे जगदीश पवार, भाजपच्या विशाखा शिरसाठ, भाजप बंडखोर रामदास सदाफुले, काँग्रेसच्या बंडखोर सारिका किर, शिवसेनेचे बंडखोर अरुण गिरजे, मनोज सातपुते, अपक्ष नितीन जगताप, राष्ट्रीय समाज पक्षाचे जितेंद्र लासुरे यांचा समावेश आहे.
प्रभाग 26
या पोटनिवडणुकीत सहा उमेदवार रिंगणात आहेत. यात प्रामुख्याने माजी नगरसेवक व मनसेचे उमेदवार दिलीप दातीर, शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस महाआघाडीचे शिवसेनेचे उमेदवार मधुकर जाधव, माकपाचे मोहन जाधव व भाजपचे कैलास अहिरे या चार प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसह सुवर्णा कोठावदे व एकनाथ साळवे हे दोन अपक्ष अशी 6 जणांमध्ये लढत रंगणार आहे.
मतमोजणी क्लबहाऊस येथे
मतदानानंतर लगेचच दुसर्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (दि.10) सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ केला जाणार आहे. साधारणत: सहा फेर्यांच्या माध्यमातून मोजणी प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांनी सांगितले.