नाशिक । प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नाशिक, पुणे व नगर या तीन जिल्ह्यात ३१ महाविद्यालये सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. या ३१ महाविद्यालयांत नाशिकमधील पाच ते सहा महाविद्यालयांचा समावेश असल्याचे समजते. विद्यापीठाअंतर्गत तीन जिल्ह्यांमध्ये सध्या सुमारे ६५० महाविद्यालये, २५० इन्स्टिट्यूट, संशोधन संस्था अशा सुमारे १ हजार संस्था असून, त्यात लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. गेल्या काही काळात व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असला तरी अद्यापही कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे कमी झालेले नाही.
राज्य शासनाने १५ सप्टेंबर २०१७ ला काढलेल्या शासन निर्णयानुसार नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी महाविद्यालयाची इमारत, पायाभूत सुविधा, फिक्स डिपॉजिट यासह ११ मुद्यांचा समावेश केला आहे. त्यानुसार महाविद्यालयांकडून विद्यापीठांकडे प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यास व्यवस्थापन परिषद सर्व निकषांची व कागदपत्रांची तपासणी करून हे प्रस्ताव मान्य केले जातात. त्यानंतर राज्य शासनाकडून यास अंतिम मंजुरी दिली जाते.
पुणे विद्यापीठाने नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यामध्ये विद्यापीठाकडे एकूण ३९ महाविद्यालयांचे प्रस्ताव आले होते. त्यातील २९ प्रस्ताव पुणे, नगर ४, तर नाशिकमधून ६ महाविद्यालयांसाठीचे प्रस्ताव होते. ३९ पैकी ३६ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांचे, तर ३ प्रस्ताव विधी महाविद्यालयांचे होते. हे प्रस्ताव नोव्हेंबर संपण्यापूर्वी राज्य शासनाकडे दाखल करणे आवश्यक होते. त्यामुळे (शुक्रवारी) पुणे विद्यापीठात तातडीने व्यवस्थापन परिषदेची बैठक घेतली. त्यामध्ये अपूर्ण कागदपत्र व त्रुटींमुळे आठ प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. मंजूर झालेले ३१ प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत.