Saturday, May 4, 2024
Homeनाशिकशिक्षक भरती प्रक्रियेत ८३८ उमेदवारांची निवड

शिक्षक भरती प्रक्रियेत ८३८ उमेदवारांची निवड

नाशिक । प्रतिनिधी

शिक्षण विभागातर्फे ‘पवित्र’ संकेतस्थळाद्वारे राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत खासगी शिक्षण संस्थांतील नववी ते बारावीसाठीच्या ८३८ उमेदवारांची विनामुलाखत निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता उर्वरित पदांसाठीच्या भरतीची उमेदवारांना प्रतीक्षा आहे.

- Advertisement -

राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त असलेल्या १२ हजार जागा भरण्यासाठी पवित्र संकेतस्थळाद्वारे प्रक्रिया सुरू करण्यात आली. आधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, न्यायालयीन प्रकरणांमुळे या भरती प्रक्रियेत बराच वेळ गेला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये ५ हजार उमेदवारांची निवड यादी जाहीर करून त्यांना नियुक्ती देण्यात आली.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने भरती प्रक्रिया खोळंबली. त्यानंतर ७७१ शिक्षकांच्या निवड यादीवर आक्षेप घेऊन न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याने या यादीला स्थगिती मिळाली होती. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही जागांची वाढ होऊन ८३८ जागांसाठी पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम भरून प्रक्रिया राबवण्यात आली. विनामुलाखत भरती प्रक्रियेसाठी तयार असलेल्या खासगी संस्थांतील रिक्त जागांसाठी ही पदभरती करण्यात आली आहे. आता उर्वरित जागा कधी भरल्या जाणार, याकडे राज्यभरातील पात्रताधारक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

गणित-विज्ञान अशा काही विषयांसाठीच्या काही जागांबाबतचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे. पहिली ते आठवीच्या माजी सैनिकांच्या जागा, तसेच आधीच्या निवड यादीत निवड होऊन उमेदवार रुजू न झाल्याने रिक्त राहिलेल्या अशा एकूण बाराशे ते पंधराशे जागांसाठीची फेरी घेतली जाईल. त्यानंतर मुलाखतीद्वारे भरल्या जाणार्‍या तीन हजार जागांसाठीची फेरी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या