नाशिक । प्रतिनिधी
गरजू नागरिकांना केवळ दहा रुपयांत भोजन उपलब्ध करून देणारी योजना महाविकास आघाडीच्या सरकारकडून राबविण्यात येणार आहे. त्यानुसार येत्या २६ जानेवारीपासून जिल्ह्यात शिवभोजन थाळीचा शुभारंभ केला जाणार आहे. राज्यात दररोज १८ हजार थाळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
जिल्ह्याच्या वाटेला १००० थाळी आल्या असून त्यातील ३०० थाळी मालेगाव मनपाकडे देण्यात आल्या आहेत.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीने गरिबांना दहा रुपयांत भोजन उपलब्ध करून देणारी शिवभोजन थाळी आणली आहे. प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्याच्या मुख्यालयात ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा तीन महिन्यांचा खर्च ६.४८ कोटी येणार आहे.
अशी आहे योजना
शिवभोजन थाळीमध्ये दोन चपाती, एक वाटी भाजी, भात, एक वाटी वरण असा मेन्यू असेल. भोजनालय, स्वयंसेवी संस्था यांच्याकडून ही थाळी ५० रुपयांत उपलब्ध होणार आहे. मात्र, लाभार्थ्यांना ती दहा रुपयांत उपलब्ध करून द्यायची आहे. उर्वरित ४० रुपये शासनाकडून भोजनालय किंवा स्वयंसेवी संस्थांना देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात ३५ रुपयांत ही थाळी मिळेल. इथेही लाभार्थ्यांकडून दहा रुपये आणि उर्वरित २५ रुपये शासन देणार आहे.