Sunday, September 8, 2024
Homeनाशिकजलद न्यायासाठी साथ द्या : न्या. वाघवसे

जलद न्यायासाठी साथ द्या : न्या. वाघवसे

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात अधिक जलद गतीने न्याय देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. यामध्ये वकिलांची भूमिका महत्त्वाची असून न्यायालयीन सर्व कामकाजात वकिलांनी तसेच नाशिक जिल्हा बार असोसिएशनने साथ द्यावी, असे आवाहन नवनियुक्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी येथे केले.जिल्हा न्यायालय आवारातील अ‍ॅडव्होकेट चेंबरमध्ये जिल्हा न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशपदी नव्याने नियुक्त झालेले न्यायाधीश अभय वाघवसे यांचे नाशिक बार असोसिएशन व वकिलांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी न्या. वाघवसे बोलत होते.

- Advertisement -

न्या. अभय वाघवसे म्हणाले, न्यायालयीन खटल्यांची संख्या पाहता अधिकाधिक गतीने खटले निकाली काढणे आवश्यक आहे. अनेक महत्त्वाचे, महिलांबाबतचे खटले जलद गतीने सोडवण्याचा प्रयत्न असेल. तसेच जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी तसेच नूतन इमारतीसाठी न्यायव्यवस्थेकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तत्पूर्वी बार असोसिएशनची भूमिका मांडताना महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी नाशिक बार असोसिएशन नेहमीच जलद न्यायप्रक्रियेसाठी आग्रही राहिल्याचे सांगताना महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचीही हीच भूमिका असल्याचे नमूद केले.

प्रास्ताविक नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी केले. यावेळी त्यांनी नूतन इमारत व येथील वकीलवर्गाच्या अडचणी मांडल्या. सूत्रसंचालन खजिनदार अ‍ॅड. संजय गिते यांनी केले. अ‍ॅड. हर्षल केंगे यांनी आभार मानले.
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश गणेश देशमुख, एस. डी. त्रिपाठी, व्ही. एस. कुलकर्णी, नाशिक व गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भिडे, सदस्य अ‍ॅड. जयंत जायभावे, सरकारी वकील अजय मिसर, अ‍ॅड. महेश लोहिते, नाशिक बार असोसिएशनचे सचिव अ‍ॅड. जालिंदर ताडगे, नाशिकरोड बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुदाम गायकवाड, वकील सोसायटीचे चेअरमन अनिल विघ्ने आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या