नाशिक । प्रतिनिधी
राज्य परीक्षा परिषदेकडून १९ जानेवारी रोजी घेण्यात येणार्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीसाठी प्रवेशपत्र www.mahatet.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे असून प्रवेशपत्र प्राप्त न झाल्यास अर्ज भरल्याच्या आवश्यक कागदपत्रांसह परीक्षा परिषदेच्या कार्यालयाशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन परिषदेकडून करण्यात आले आहे.या परीक्षेसाठी राज्यभरातून साधारण १ लाख ५०० पेक्षा अधिक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. परीक्षेला जाताना उमेदवारांनी प्रवेशपत्रासोबत कोणतेही एक छायाचित्र असणारे ओळखपत्र सोबत बाळगायचे असल्याच्या सूचनाही परिषदेने दिल्या आहेत.
राज्यात १९ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी साडेचारपर्यंत दोन पेपर होणार आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमे अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व निर्णय तसेच माहिती परिषदेच्या https://mahatet.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.