Sunday, September 15, 2024
Homeनाशिकजि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक जानेवारीत

जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक जानेवारीत

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक २ जानेवारी २०२० रोजी होण्याची शक्यता आहे. यासाठी उद्या शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक कार्यक्रम घोषित करून अजेंडा काढला जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

विद्यमान पदाधिकार्‍यांची अडीच वर्षांची मुदत २१ सप्टेंबर रोजी संपुष्टात आली. मात्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने ऑगस्ट महिन्यात पदाधिकार्‍यांना चार महिन्यांची मुदतवाढ दिली. या मुदतवाढीचा अध्यादेश २३ ऑगस्टला काढण्यात आला. त्यामुळे या तारखेपासून पुढे १२० दिवसांचा कालावधी ग्राह्य धरत ग्रामविकास विभागाने गेल्या आठवड्यात नवीन आदेश काढत विद्यमान पदाधिकार्‍यांना दिलेली १२० दिवसांची मुदत २० डिसेंबर रोजी संपत असल्याचे सांगितले.

मात्र या पत्रापाठोपाठ काही तासातच नव्याने पत्र ग्रामविकासकडून काढून यात २० डिसेंबर रोजी वाढीव मुदत संपत असल्याने निवडणूक प्रक्रिया राबवण्यात यावी, असे स्पष्ट केले. या पत्रानुसार उद्या शुक्रवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची चिन्हे आहेत.

पदाधिकार्‍यांना पुन्हा मुदतवाढ
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पदाधिकार्‍यांची मुदत संपल्यानंतर यापूर्वी देण्यात आलेल्या चार महिन्यांच्या मुदतवाढीनंतर अजून नव्याने दोन महिने अशी एकत्रित सहा महिन्यांची मुदतवाढ देणारे विधेयक विधान परिषदेत संमत झाले आहे. नव्याने वाढीव कालावधीमध्ये पदाधिकारी निवडणूक होणार असून तोपर्यंत जुन्या पदाधिकार्‍यांना कामकाज पाहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समित्यांचे सभापती यांची चार महिन्यांची मुदतवाढ २० डिसेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. मात्र नवे पदाधिकारी निवडीसाठीची प्रक्रिया २० डिसेंबरनंतर सुरू केली जाणार आहे. त्यामुळे २० डिसेंबरनंतर पदाधिकार्‍यांचे कामकाज बघण्याची व्यवस्था निर्माण करणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेता शासनाने पहिले चार महिने आणि त्याला जोडून आणखी दोन महिन्यांचा कालावधी कामकाज पाहण्यासाठी पदाधिकार्‍यांना दिला आहे. या वाढीव कालावधीमध्ये जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीची प्रक्रिया होणार असून निवड होताच नवे पदाधिकारी पदावर येतील त्याचवेळी जुन्या पदाधिकार्‍यांचा कालावधी संपुष्टात येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या