Saturday, May 4, 2024
Homeनाशिककांदा बाजारभाव प्रश्नी आता थेट पंतप्रधान मोदी यांना लिहिणार एक लाख पत्र-...

कांदा बाजारभाव प्रश्नी आता थेट पंतप्रधान मोदी यांना लिहिणार एक लाख पत्र- राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

नाशिक । प्रतिनिधी

राज्यात कधी नव्हे इतका कांद्याच्या बाजारभावाचा पेच निर्माण झाला आहे.आज कांद्याचे सरासरी दर अगदी ४ रूपये किलो इतक्या खाली आल्याने कांदा उत्पादकांना नफा तर दूरच उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्किल झाले आहे.कांदा उत्पादकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असतांनी सरकार मात्र काहीच हालचाल करताना दिसत नाही.त्यामुळे कांदा बाजारभावाची झालेली घसरण थांबवण्यासाठी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्ड वर लेखी पत्र पाठवणार आहेत,अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.

- Advertisement -

राज्यभरातून सुमारे एक लाख लेखी पत्र या मोहिमेतून पाठविण्यात येणार आहेत.शुक्रवार ( दि.22) पासून या मोहीमेला सुरूवात होणार आहे. राज्यातील एक लाख शेतकरी स्वतः हे पत्र लिहून त्या त्या गावातील टपाल कार्यालयात पोहच करतील.या पत्रात लिहीला जाणारा मजकूर राज्यभरातील शेतकऱ्यांना व्हाटस्अप व फेसबुक मेसेजच्या माध्यमातून दिला जाणार आहे.दि .२२ मे ते २८ मे या ८ दिवसात ही एक लाख पत्रं पाठवली जाणार आहेत.

केंद्र सरकारने कांद्याला नुकतेच जीवनावश्यक वस्तूंच्या सूचीतून बाहेर काढले आहे.परंतु , कांद्याच्या भावातील घसरण थांबण्यास तयार नाही.आधी अतिवृष्टी नंतर निर्यातबंदी व आता करोना महामारीमुळे एकामागून एका लाॅकडाऊनमुळे कांद्याचे भाव सतत कमी होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे .कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत असतांनाही सरकार मात्र कांदा प्रश्नावर काहीही उपाययोजना करताना दिसत नाही.

२० रूपये प्रति किलोने खरेदी करावी

केंद्र सरकारने २० रूपये प्रति किलो या भावाने थेट शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी करावी,ही मागणी प्रामुख्याने यावेळी या लेखी पत्रातून करण्यात येणार आहे.पावसाळा सुरू होण्यास आता फक्त दोनच आठवडे शिल्लक असल्याने शेतात काढून पडलेला लाखो टन कांदा सडण्यापूर्वी केंद्र सरकारने तात्काळ शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी करावी व कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतक-यांना न्याय द्यावा यासाठी नाशिक, अहमदनगर, सोलापूर, पुणे, सातारा, उस्मानाबाद, बीड, परभणी, अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, धुळे, औरंगाबादसह राज्यभरातील कांदा उत्पादक या पत्र मोहीमेत सहभाग घेतील.

तात्काळ निर्णय घ्यावा-दिघोळे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी या राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या