Saturday, May 4, 2024
Homeनाशिककरोना संसर्गापासून वाचण्यासाठी गर्दीपासून दूर रहा – पालकमंत्री भुजबळ यांचे आवाहन

करोना संसर्गापासून वाचण्यासाठी गर्दीपासून दूर रहा – पालकमंत्री भुजबळ यांचे आवाहन

नाशिक । प्रतिनिधी

करोना संसर्गापासून वाचण्यासाठी  सर्वांनी स्वयंशिस्त पाळा, गर्दी व एकमेकांपासून दूर राहण्याची स्वयंशिस्त पाळा असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हावासीयांना केले आहे.

- Advertisement -

करोना व जनता कर्फ्युच्या पार्श्वभूमीवर आवाहन करताना भुजबळ म्हणाले, करोना विषाणूच्या विरुद्ध लढण्यासाठी सर्व जग उभे राहिले आहे. भारत देश आणि महाराष्ट्र सुद्धा त्यात मागे नाही. आपण आता पहिल्या टप्प्याकडून कडून-दुसर्‍या टप्प्याच्या पुढे जात आहोत. पहिल्या टप्प्यात परदेशातून येणारे लोक जे हे विषाणू घेऊन इथपर्यंत आले आहेत, त्यांचं क्वारंटाईन करणे, त्यांचे विलगीकरण करून त्यांना स्वतंत्र ठेवणे, या लोकांच्या संपर्कात जे लोक आलेत ते वाहनचालक असो किंवा इतर लोक हा दुसरा टप्पा झाला. त्याच्यानंतर तिसरा टप्पा जो आहे सर्रासपणे आपल्या वस्त्यांमध्ये हा विषाणू पसरणे. अतिशय कठीण अतिशय धोकादायक असा हा टप्पा आहे.

आजपर्यंत तरी यावर एकच मार्ग आहे, तो म्हणजे याच्यापासून दूर राहणे. ज्याला विषाणू बाधा झाली आहे त्याच्याशी संपर्क होऊ न देणे. या विषाणू बाधेतील लक्षण १४ दिवसानंतर दिसतात, या १४ दिवसात आपल्याला लक्षात देखील येत नाही त्या व्यक्तीला विषाणू बाधा झाली आहे. आपण त्याच्याशी बोलतो, हातात हात घेतो, त्याच्याजवळ बसतो त्यावेळी तो प्रसार आपल्यालाही होऊन जातो. त्यामुळे एकमेकांपासून दूर राहणे, रस्त्यांवर गर्दी न करणे हा एकमेव मार्ग आपल्याकडे आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आपणास सातत्याने मार्गदर्शन करत आहेत, काही लोक त्याचा गंभीरपणे विचार करत आहेत, परंतु काही लोक अतिशय सहजपणे हे घेत आहेत. हे धोकादायक आहे. म्हणूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्याला रविवारी स्वतःहून संचारबंदी लागू करून घ्यायची आणि लोकांपासून, गर्दीपासून दूर राहायचे सांगितले आहे.

आपण सर्वांनी त्यात सामील झाले पाहिजे. सर्व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे आदेशांचे काटेकोरपणे पालन आपण केले पाहिजे कारण यातून वाचण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे ही बाधा होऊ न देणे. पण झाल्यानंतर मात्र अतिशय कठीण परिस्थितीला सर्वांना सामना करावा लागेल. या आव्हानाला सर्वांनी प्रतिसाद द्या व स्वतःहून कर्फ्यू पाळा गर्दीमध्ये जाऊ नका, कार्यक्रम थांबवा, स्वच्छता पाळा आणि शासनाच्या अधिकार्‍यांना सहकार्य करा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

तर सात वर्ष शिक्षा
रेशन कार्डावर दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य देण्याचे ताबडतोब आदेश काढण्यात आले आहेत. मास्क आणि सॅनिटायझर हे देखील अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवांमध्ये आलेले आहेत. जे यात कुठल्याही गोष्टींचा काळाबाजार करताना सापडले तर त्याला सात वर्षांची शिक्षा होईल. अशारितीने प्रत्येकाने स्वतःवरच बंधने घातली पाहिजेत. रेशन दुकानांवर ईपॉज मशीनची थम्ब इम्प्रेशन बंद करण्यात आली आहेत.

सहज घेऊ नका
ज्यांना बाधा झाली आहे त्यांना वेगळ्या ठिकाणी क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची व्यवस्था केली आहे. अशावेळी काही लोक परदेशातून येतात गुपचूप राहतात. शासन, अधिकारी वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. काही लोक त्याचा गंभीरपणे विचार करत आहेत, परंतु काही लोक अतिशय सहजपणे हे घेत आहेत. हे धोकादायक आहे. यामुळे स्वत:ला, कुटुंबाला व इतर समाजाला आपण धोका पोहचवत आहोत याचे भान बाळगा असे भुजबळ यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या