म्हेळुस्के | वार्ताहर | Mheluske
कादवा नदीकाठासह मेधने-आहेर यांच्या शेतात वावर असणारा बिबट्या (Leopard) अखेर वनविभागाने (Forest Department) लावलेल्या पिंजऱ्यात पाच दिवसांनंतर जेरबंद झाला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. म्हेळुस्केत पुन्हा एकदा बिबट्याचा खुलेआम वावर असल्याचे निदर्शनास आल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये (Farmer) दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतीमधील कामे करण्यासही अडचणी येत होत्या. अशातच पाच दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास अनिल मेधने यांच्या वस्तीवर बंदिस्त असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यातून मोठ्या शिताफीने बिबट्याने वासरावर हल्ला करून ठार करत दूरपर्यंत खेचत नेऊन फडशा पाडला होता.
ही घडलेली घटना अनिल मेधने यांच्यासह कुटुंबीयांनी (Family) बघितली असल्याने त्यांचे संपुर्ण कुटुंब दहशतीखाली वावरत होते. त्यानतंर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘देशदूत’ने (Deshdoot) वनविभागाकडे या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. यानंतर वनविभागाने तात्काळ प्रतिसाद देत शनिवारी बिबट्याचा संचार असणाऱ्या आहेर वस्तीवरील शेतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला. विशेष म्हणजे त्याच रात्रीसह बिबट्या सलग दोन दिवस पिंजऱ्यात येऊन गेला.
परंतु पिंजऱ्याच्या (Cage) किरकोळ तांत्रिक नादुरुस्तीमुळे बिबट्या जेरबंद होत नव्हता. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी पिंजऱ्याची तात्पुरती दुरुस्ती करून पिंजरा पुन्हा सज्ज केला आणि अखेरीस सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या अलगद पिंजऱ्यात येऊन अडकल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच बघ्यांची तोबा गर्दी झाल्याने प्रसंगावधान राखत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बिबट्याला ताब्यात घेतले.
तसेच वनविभाच्या माहितीनुसार जेरबंद झालेला बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे सहा ते सात वर्षांचे आहे. याच बिबट्याने मागील दोन दिवसांपूर्वी जवळच्याच शेतात काम करणाऱ्या वाळू बर्डे या शेतकऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सावधानता बाळगत बर्डे यांनी पलायन करून आपला जीव वाचवला. यावेळी उपस्थित नागरिकांनी जेरबंद केलेला बिबट्या इथेच जवळपासच्या जंगलात सोडून देत असल्याचा आरोप वनविभागावर केला असता असं काही केलं जात नसल्याचे स्पष्टीकरण देत जेरबंद केलेला बिबट्या पहिले नाशिक (Nashik) येथील मुख्य कार्यालयीन कार्यक्षेत्रात नेऊन त्याच्यावर योग्य ते उपचार करून वरिष्ठांच्या आदेशाने त्याला दुरवर जंगलात नेऊन सोडले जाते.
दरम्यान, याबाबत अधिकची खात्री करावीशी वाटली किंवा पकडलेला बिबट्या खरोखर कुठे सोडला जातो याची प्रत्येक्ष पाहणी करायची असल्यास जबाबदार नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून माहिती घेण्याचे आवाहन वनविभाग कर्मचाऱ्यांनी केले आहे. यावेळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी दिंडोरी(प्रा)सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अशोक काळे, वनरक्षक गोरख गांगोडे,वनमजुर शांताराम शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.
आमच्याकडे ऊस शेती मोठ्याप्रमाणावर असल्याने बिबट्यांची संख्याही अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.एक बिबट्या जेरबंद झाल्याने जबाबदारी संपली असा गैरसमज न ठेवता वनविभागाने अधिक निर्णायक पावले उचलून नागरिकांचे संरक्षण करावे.
योगेश बर्डे,उपसरपंच, म्हेळुस्के
बिबट्याने वस्तीवर येऊन आमच्या डोळ्यासमोर पशुधनावर हल्ला करत ठार केल्याने कुटुंबियांवर बिबट्याच्या दहशतीचा धसका बसला होता,परंतु काही अंशी जेरबंद केलेल्या बिबट्यामुळे दिलासा मिळाला आहे.
अनिल मेधने, शेतकरी, म्हेळुस्के




