नाशिक | Nashik
सातपूर परिसरातील (Satpur Area) शिवाजीनगर (Shivaji Nagar) तुकाराम गार्डनजवळील विठ्ठल-रुख्मिणी श्रीराम रो-हाऊस परिसरात आज सकाळपासून बिबट्याच्या (Leopard) वावरामुळे एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी ७ वाजेपासून सुरू झालेली ही थरारक घटना दुपारपर्यंत ‘लपाछपी’च्या खेळातच अडकून पडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी बांधकाम सुरू असलेल्या रो-हाऊसवर कामगार आपापल्या कामात गुंतले होते. काही जण टाइल्स बसवत होते, तर काही पाणी मारत होते. याचदरम्यान अचानक पाठीवर जखम झालेला बिबट्या त्यांच्यासमोर आला. क्षणभर सर्व काही स्तब्ध झाले आणि पुढच्याच क्षणी कामगारांनी जीव वाचवण्यासाठी धूम ठोकली. दरम्यान, सुमारे ९ वाजेच्या सुमारास हा बिबट्या रो-हाऊस परिसरात शांतपणे बसलेला दिसून आला. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. मात्र, परिस्थिती तणावपूर्ण असतानाच बिबट्या अचानक बाहेर पडला आणि नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. भीतीने लोकांनी अक्षरशः पळ काढल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
घटनेची माहिती मिळताच नगरसेवक अमोल पाटील यांनी तातडीने वनविभाग आणि पोलिसांना (Forest and Police) पाचारण केले. गंगापूर पोलीस (Gangapur Police) पथक, वनविभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होताच शोधमोहीम सुरू करण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार बिबट्या रो-हाऊसमध्ये लपल्याची शक्यता वर्तवण्यात आली. मात्र, शोधमोहीम सुरू असतानाच तो जवळील गवतामधून बाहेर येताना दिसला. वनविभागाने त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण तो पुन्हा झुडपांमध्ये पसार झाला. परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गवत आणि झुडपांमुळे बिबट्याचा अचूक ठावठिकाणा मिळणे कठीण जात असून, प्रशासनाने ड्रोनच्या सहाय्याने शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. जवळपास चार तासांपासून बिबट्या झाडाझुडपांमध्ये लपून बसल्याची माहिती आहे.
दरम्यान, सुरुवातीला बिबट्या ध्रुव नगर परिसरात असल्याची अफवा पसरली होती. मात्र नंतर तो शिवाजीनगरमधील तुकाराम महाराज क्रीडांगण परिसरात, तुळजाभवानी मंदिराच्या मागील बाजूस असल्याचे स्पष्ट झाले. सध्या वनविभागाने संपूर्ण परिसर सील केला असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही कुतूहलापोटी काही ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसून आले. संपूर्ण परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून “कधीही काहीही घडू शकते” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद (Imprisoned) करण्यासाठी प्रशासन आणि रेस्क्यू टीमकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.





