बोरगाव | वार्ताहर | Borgaon
सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) बोरगाव घाटमाथा परिसरातील वांजुळपाडा येथील एकनाथ चिंतामण मेघा (३६) यांच्या शेतातील घराला (House) रात्री साडेआठच्या सुमारास आग लागली. यात रोख रक्कम दीड लाख रुपये, धान्य, कपडे व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. यात जवळपास पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही.
वांजुळपाडा येथील प्रभावती एकनाथ मेघा (३४) व एकनाथ मेघा (३६) हे डोंगरीदेवाचा कार्यक्रम बघण्यासाठी गावात गेले असताना त्यावेळी ही घटना घडली. यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. गावातील नागरिक प्रकाश जोपळे हे आपल्या शेतीला पाणी भरण्यासाठी जात असताना घराला आग लागली हे बघितले असता त्यांनी गावातील नागरिकांना संपर्क साधला. परंतु आगीने (Fire) रौद्ररूप धारण केल्यामुळे घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले.
दरम्यान, भाऊराव जोपळे, मधुकर जोपळे, रमेश पवार, दिलीप पवार, कांतीलाल पवार यांनी मदतीला येत आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्र रूप धारण केल्याने सर्व घर जळून खाक झाले. शनिवारी नागशेवडी येथील तलाठी सचिन निकम व कोतवाल रघुनाथ गांगुर्डे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे. प्रशासनाने कुटुंबाला (Family) अर्थसहाय्य करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.