नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यातील सद्यस्थिती, जनतेचे प्रलंबित प्रश्न आणि सरकारच्या धोरणांविरोधात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) वतीने येत्या २४ ऑक्टोबर रोजी महामोर्च्याच्या पूर्वतयारीसाठी आज काँग्रेस भवन, महात्मा गांधी रोड, नाशिक (Nashik) येथे प्रमुख नेत्यांची महत्त्वाची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत मोर्च्याचे नियोजन, कार्यकर्त्यांची फळी आणि आंदोलनाची रणनीती यावर सविस्तर चर्चा करून रुपरेषा निश्चित करण्यात आली.
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सांगितले की, “हा मोर्चा केवळ राजकीय नसून जनतेच्या हक्काची लढाई आहे. सरकारच्या दडपशाहीविरोधात आणि अन्यायाविरोधात जनता स्वयंस्फूर्तीने या मोर्च्यात सामील होईल. हा मोर्चा ऐतिहासिक ठरेल. या नियोजन बैठकीमुळे (Meeting) महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून, मोर्च्याच्या यशासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे.
बैठकीला महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश सचिव प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड, नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश (बबलु) खैरे, काँग्रेस उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळ यांच्यासह माजी स्थायी समिती सभापती संजय चव्हाण (शिवसेना-उद्धव ठाकरे गट) राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष छबु नागरे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) काॅ. राजु देसले ( आयटक), ॲड.तानाजी जायभावे (सी.पी.एम.), काॅ.तल्हा शेख, काॅ. मनोहर पगारे, काॅ. प्राजक्ता कापडणे, काँग्रेसचे उध्दव पवार, पोपटराव धात्रक, जयेश पोकळे, विद्यार्थी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस समाधान बागुल, संदिप वाघ राष्ट्रवादी काँग्रेसचे दर्शन लड्डा आदींसह पदाधिकारी बैठक वेळी उपस्थित होते.




