नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर महायुतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हेच घेतील. मात्र, येणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत, प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढविता यावी यासाठी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणुकीची तयारी ठेवावी त्यादृष्टीने आतापासूनच कामाला लागावे, अशा सूचना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मंडल पदाधिकाऱ्यांना केल्या.
भाजप उत्तर महाराष्ट्रातील मंडल अध्यक्ष आमदार व खासदार यांची बैठक आज (गुरुवार दि.१६) रोजी नाशिक येथील लक्ष्मी लॉन्स बँक्वेट हॉल, पंचवटी (Panchvati) येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व अहिल्यानगर जिल्ह्यातील मंडल अधिकारी व लोकप्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हेच घेतील. सध्याच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत, प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक (Election) लढविता यावी यासाठीच तो काम करत असतो. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणुकीची तयारी ठेवावी. तसेच त्यासाठी आतापासूनच कामाला लागावे. या पार्श्वभूमीवर आजची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, आगामी निवडणुका वेगवेगळ्या किंवा एकत्र लढण्याबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल”, असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता दिवाळीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत संघटनात्मक बैठका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये येऊन घेतली होती. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक रचनेची बैठक आज बोलवली होती. आजच्या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे. कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे, त्यामुळे सर्वांना संधी मिळावी यासाठी स्थानिक पातळीवर काही ठिकाणी एकत्रित लढणार असलो तरी स्वबळाचाच कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने त्यानुसारच निवडणूक लढवली जाणार आहे. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष असून नेते जसा आदेश देतील तो प्रत्येक कार्यकर्ता पाळत असतो” असेही रवींद्र चव्हाण यांनी म्हटले.
विरोधकांकडून बोगस मतदानाबाबत नरेटिव्ह पसरवला जातोय
देशात व राज्यात बोगस मतदानाबाबत विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. त्यावर बोलतांना चव्हाण म्हणाले की, मतदार यादी या चांगल्या असाव्या याबाबत प्रत्येक पक्ष बोलत असतो. मतदार नोंदणीची प्रक्रिया असते यासाठी निवडणूक आयोग कार्यक्रमाही देत असतो. त्यासाठी वेळही दिला जातो. या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला माहिती असतात. मात्र, विरोधकांकडून मतदार यादीबाबत नरेटिव्ह पसरविण्यात येत आहे. याबाबतचा निर्णय निवडणूक यंत्रणा घेईल असेही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मंत्री माणिकराव कोकाटेंच्या बंधूंचा भाजपात प्रवेश
राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे बंधू भारत कोकाटे यांनी आज आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. त्यावर बोलतांना चव्हाण म्हणाले, भारत कोकाटे व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे मैत्रीपूर्ण संबंध पहिल्यापासूनच होते. आता कोकाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे सिन्नर तालुक्यात पक्षाला एक बळ निश्चितपणे मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.




