विराणे | वार्ताहर
ना मंगल कार्यालय… ना अलिशान मंडप.. ना बँड बाजा बाराती.. ना जेवणाच्या पंगती.. ना वरमाया ना करवल्या. अस म्हटल की विवाह कसा होईल? परंतु विराणे येथील सामाजिक कार्यकर्ते शांताराम पगार यांची मुलगी गायत्री व टेहेरे येथील प्रगतशील शेतकरी तुळशिराम शेवाळे यांचे सुपुत्र नंदकिशोर यांचा विवाह अगदी चार लोकांत अतिशय साध्या पद्धतीने संपन्न झाला.
सध्या संपूर्ण जगात कोरोना आजाराने धूमाकूळ घातला आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने देशात जमावबंदी आदेश आहे. जमावबंदी आदेशामुळे विविध सण समारंभांवर देखील बंधन आली आहेत.
याचा परिणाम लग्न समारंभ देखील झाला. पाल्याचा विवाह स्मरणात रहावा यासाठी अनेक पालकांनी यावर्षी ठरलेली विवाह तारीख रद्द करत पुढच्या वर्षी विवाह करण्याचे ठरविले.
परंतु खोट्या प्रतिष्ठेला, हौसेला फाटा देत व शासनाच्या संचारबंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन करत पगार व शेवाळे परिवाराने समाजासमोर आदर्श निर्माण केला.
या विवाहासाठी भाऊबंदकी, नातेवाईक, मित्रपरिवार यांना न आमंत्रण देता वधू व वराच्या आई वडीलांनीच पार पाडला. दोन्ही परिवारात मुलगी व मुलगा एकटे असूनही झगमटाला आवर घातला.
अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने संपन्न झालेल्या या विवाहाचे कौतुक होत असून संपूर्ण काटवण परिसरात एकच चर्चा आहे, “एक विवाह ऐसा भी।”
विवाहची तारीख पूर्वीच ठरलेली होती. संचारबंदी असल्याने विवाह पुढे ढकलण्याचा अनेकांनी सल्ला दिला. शासन आदेशाचे पालन करून हौसमौजेला फाटा देऊन निर्णय घेतला.
– शांताराम पगार, वधू पिता, विराणे