मनमाड | बब्बू शेख | Manmad
मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमानाचा (Temperature) पारा वाढण्यास प्रारंभ झाला असतांना काही दिवसापूर्वी अकस्मात निर्माण झालेले ढगाळ वातावरण व त्यापाठोपाठ अवकाळी पावसाबरोबर (Unseasonal Rain) गारपीट झाल्याने या नैसर्गिक आपत्तीचा फटका इतर शेतपिकांबरोबर मनमाड नांदगावसह जिल्हयातील ग्रामीण भागात असलेल्या शेकडो एकरवरील आंबे बागांना बसला आहे. बदलत्या वातावरणामुळे झाडांना मोहर लागला नाही व अवकाळी व गारपिटच्या तडाख्याने लागलेला मोहर गळून पडला असून रोगाचा प्रादुर्भाव देखील होत असल्याने यंदा आंबा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कधी अस्मानी तर कधी सुलतानी असें एका पाठोपाठ एक येणारे संकट शेतकऱ्यांचा (Farmer) पिच्छा सोडायला तयार नाही. नाशिक जिल्हा कांदा, द्राक्षे, डाळिंब पाठोपाठ आंबा उत्पादनासाठी (Production) देखील ओळखला जावू लागला आहे. मनमाड, नांदगावसह जिल्ह्यात हजारो शेतकरी आंब्याची लागवड करत असून अनेक शेतकऱ्यांची आमराई देखील आहेत. काही शेतकरी देशभरात तर काही शेतकरी विदेशात आंब्याची निर्यात करतात यंदा मनमाड, नांदगाव तालुक्यांसह जिल्ह्यात ४ हजार ९३४.८६ हेक्टरवर आंब्याची लागवड करण्यात आली असून त्यातून ७ हजार ७९४.९० मेट्रिक टन आंबा उत्पादक होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.
मात्र गेल्या काही महिन्यापासून कधी पाऊस (Rain) होतो कधी कडक उन जाणवते तर कधी कडाक्याची थंडी पडते. यंदा पावसाळ्यात पाहिजे तेवढा पाऊस झाला नव्हता. मात्र, परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावली होती त्यामुळे सर्वच पिकासोबत फळ बागांना देखील मोठा फायदा झाला. मात्र. आंब्याच्या झाडांना मोहर लागताच तापमांनात मोठी वाढ झाल्यामुळे मोहर गळू लागला होता. त्यातून शेतकरी सावरत नाही तोच गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण आणि अचानक अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली सतत हवामान आणि वातावरणात होत असलेल्या या बदलाचा परिणाम पिका सोबत आंब्याला देखील बसला आहे.
वातारणाच्या बदलामुळे अगोदरच आंब्याला उशिराने मोहर लागला काही झाडांना तर मोहर लागला नाही ज्यांना लागला तो देखील गळून पडला आता वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडावरील फळ गळती होऊ लागली आहे. मोठ्या प्रमाणात कैऱ्या गळून पडत असल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल होऊन संकटात सापडला आहे, सरकारने पिकासोबत फळ बागांचे विशेषतः आंबे बागांचे देखील पंचनामे करून नुकसान (Damages) भरपाई देण्यात यावी अशी जोरदार मागणी आंबे उत्पादक शेतकऱ्यांतर्फे केली जात आहे.
माझ्याकडे आंब्याचे २५ झाडे असून त्यात केसर, गावठी यांसह इतर आंब्याच्या झाडांचा समावेश आहे. दिवस रात्र करून तळहातांच्या फोडा प्रमाणे झाडे जपली. यंदा चांगला मोहर लागला होता त्यामुळे चांगले उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती. मात्र अगोदर उष्णतेची लाट त्यानंतर ढगाळ वातावरण आणि अचानक झालेला पाऊस व गारपिटीमुळे मोहर गळती झाली आणि आता झाडावरून कैऱ्या गळून पडत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गान हिरावून घेतला आहे.
भय्यासाहेब देशमुख, शेतकरी