Saturday, October 3, 2026
Homeक्राईमNashik News : बेचाळीस खुनांनंतर झाडाझडती; शिक्षणमंत्र्यांनी केली पोलीस आयुक्तांशी चर्चा

Nashik News : बेचाळीस खुनांनंतर झाडाझडती; शिक्षणमंत्र्यांनी केली पोलीस आयुक्तांशी चर्चा

सात दिवसात 'क्राईम' घटण्याचा केला दावा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत म्हणजेच नऊ महिन्यांतन तब्बल बेचाळीस खून (Murder) झाल्याने गुन्हेगारी संदर्भात शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी पोलीस आयुक्तालयात (Police Commissioner) सोमवारी (दि. २९) आढावा घेत तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या.

- Advertisement -

या चर्चेअंती भुसे यांनी पोलिसांच्या (Police) ‘प्रभावी कामगिरीचा प्रत्यय येत्या सात दिवसांत पाहायला मिळेल, असे सांगून कोणत्याही गुन्ह्यात नाव निष्पन्न झालेल्या कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यास व नेत्यास कार्यवाहीस सामोरे जावेच लागेल, असेही स्पष्ट केले. शहरात खून, हाणामाऱ्या व प्राणघातक हल्ले वाढले असून, गोळीबारासह (Firing) खुनाच्या गुन्ह्यात भाजपच्या नेत्यांचा थेट संबंध आढळल्याने खळबळ उडाली आहे.

त्यातच अनेक गुन्ह्यांसह खुनांत विधिसंघर्षितांचाही समावेश आहे. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणासंदर्भात सूचना देण्यासाठी मंत्री दादा भुसे सोमवारी अचानक आयुक्तालयात आले. त्यांनी वाढत्या गुन्हेगारीसह कारणांची माहिती घेत पोलिसांनी रस्त्यावर उतरून तातडीने कारवाई करण्याच्या निर्देश दिले. त्यानंतर आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनीही सर्व अधिकाऱ्यांना गुन्हेगारी नियंत्रणाबाबत आदेश दिले आहेत.

दबाव नाही, प्रभावी पोलिसिंग दिसेल

शहरातील गुन्हेगारी व वाहतूक विषयावर पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. गुन्ह्यांत अल्पवयीनांचा समावेश असून, राज्यस्तरावरही विधिसंघर्षितांचे वय कमी करण्याबाबत कायदा करण्याबाबत विचार सुरू आहेत. गंभीर गुन्ह्यात ज्यांचा सहभाग होता. त्यांच्यावर कारवाई झाली असून, पोलिसांवर कोणताही दबाव नाही.

दादा भुसे, शिक्षणमंत्री

शहरात ‘स्ट्रीट क्राइम’ नियंत्रणासाठी आदेश दिले आहेत. सराईत गुन्हेगारांची धरपकड करण्यासह नशेबाजी करणाऱ्यांना अटकाव करीत आहोत. ‘व्हाइटनर’ च्या विक्रीसंदर्भात धोरण करण्याचा विचार सुरू आहे. सराईतांसह विधिसंघर्षितांवर प्रभावी नियंत्रण म्हणून आवश्यक पावले उचलली आहेत.

संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त

बैठकीनंतर ॲक्शन….

  • रेकॉर्डवरचे गुन्हेगार ताब्यात घ्या
  • ‘व्हाइटनर’, गांजा विक्रीवर लक्ष, खरेदीदारांवरही नजर
  • टवाळखोरांवर नियमित व कठोर कारवाई करा
  • रात्री बारा वाजेपर्यंत निरीक्षक असतील पोलीस ठाण्यात
  • विधिसंघर्षितांचे समुपदेशन करुन त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करा
  • तडीपारांनाही ताब्यात घ्या
  • गुन्हेगारी नियंत्रणाचा नियमित आढावा घ्या
  • वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची पथके रस्त्यावर दिसतील
  • सायंकाळपासून वरिष्ठ निरीक्षकांसह पथके ‘ऑन ड्युटी’ राहतील
  • ‘फिक्स पॉइंट’, ‘स्टॉप अँड सर्च’, नाकाबंदी वाढवा
  • मध्यरात्री बारानंतर विशेष गस्त सुरु ठेवा

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...