नाशिक | Nashik
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) एक मोठी दुर्घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडमधील मोशी (Moshi) कचरा डेपो शेजारी असलेली एक इमारत कोसळली असून, या इमारती ढिगाऱ्याखाली साधारण १४ ते १५ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अतिवृष्टीमुळे कचऱ्याचा मोठा डोंगर या इमारतीवर कोसळल्याने ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे नाशिकहून (Nashik) तातडीने पुण्याकडे (Pune) रवाना झाले आहेत.ते स्वतः मोशी येथील दुर्घटनास्थळाला भेट देऊन सुरू असलेल्या बचावकार्याचा आणि मदतकार्याचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत.
हे देखील वाचा : Pune News : पुण्यात मुसळधार पावसामुळे इमारत कोसळली; १५ जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी रवाना झाली असून, शोध व बचावमोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन व्यवस्थापनाची इतर यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली असून ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली नेमके किती नागरिक अडकले आहेत, याची अधिकृत माहिती बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पूरसदृश स्थिती; वाहतूक ठप्प
गेल्या काही तासांपासून पुणे शहर, उपनगरे आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक पट्ट्यासह निवासी भागांत पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुख्य रस्त्यांवर पाणी आल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांना प्रवासादरम्यान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे.




