नाशिक | Nashik
आज (रविवारी) जागतिक महिला दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, नाशिकमध्ये घडलेली एक घटना समाजातील मानवतेचा आणि संवेदनशीलतेचा संदेश देऊन गेली. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी अपघातग्रस्त महिलेला तात्काळ मदतीचा हात देऊन पुन्हा एकदा ‘संकटमोचक’ म्हणून आपली ओळख अधोरेखित केली.

गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर (NashikTour) असताना सकाळी रेल्वे स्टेशनहून शहरात येत होते. त्याचवेळी उपनगर (Upnagar) सिग्नलला एका महिलेला अचानक चक्कर आल्याने ती रस्त्यावर पडली होती. आसपासचे लोक जमा झाले होते. त्यावेळी मंत्री महाजन यांच्या वाहनाचा ताफा तेथून जात असताना त्यांनी तात्काळ ताफा थांबवला आणि स्वत: त्या महिलेजवळ जाऊन तिची विचारपूस केली.यावेळी त्यांनी लागलीच उपस्थितांना मदतीचे आवाहन करत आपल्याच वाहनातून पाण्याची बॉटल मागवत महिलेला पाणी देखील दिले. यानंतर सदर महिलेला रुग्णालयात नेण्याबाबत विचारपूस केली, मात्र किरकोळ जखम झाल्याचे महिलेने सांगितले. त्यांच्या या तत्परतेमुळे महिलेला दिलासा मिळाला असून, नागरिकांनी देखील मंत्री महाजन यांच्या भूमिकेचे स्वागत केले.
दरम्यान, आजचा दिवस जागतिक महिला दिन (International Women’s Day) असल्याने या घटनेला अधिक भावनिक स्पर्श मिळाला. महिलांविषयी असलेला आदर आणि संवेदनशीलता याचे जिवंत उदाहरण या प्रसंगातून पाहायला मिळाले. मंत्री गिरीश महाजन हे संकटाच्या वेळी तत्परतेने मदतीला धावून जाणारे नेते म्हणून ओळखले जातात. अनेक वेळा सामान्य नागरिक अडचणीत असताना त्यांनी स्वत: पुढे येत मदत केली आहे. त्यामुळेच लोक त्यांना प्रेमाने ‘संकटमोचक’ असे संबोधतात. आजच्या या घटनेमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, सार्वजनिक जीवनात असलेला नेता केवळ निर्णय घेणारा नसून मानवी संवेदना जपणारा असावा आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या कृतीतून याचे प्रत्यंतर आले.




