ओझे | विलास ढाकणे | Oze
राज्य सरकारने महाराष्ट्रातील (Maharashtra) विविध भागांत दुष्काळ जाहीर केला असला तरी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि नाशिक हे दोन तालुके या यादीतून वगळण्यात आले आहेत. त्यामुळे दिंडोरी तालुका (Dindori Taluka) दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी आग्रही मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत दिंडोरी तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि दिंडोरी विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी दिली. कादवा साखर कारखान्याच्या ५० व्या बॉयलर अग्नि प्रदीपन सोहळ्यात नरहरी झिरवाळ बोलत होते.
यावेळी बोलताना मंत्री झिरवाळ म्हणाले, दिंडोरी तालुका दुष्काळग्रस्त (Drought) जाहीर व्हावा की नाही याबाबत शेतकर्यांच्या चर्चेतून दोन वेगवेगळे मत प्रवाह दिसून येत होते. सध्या राज्यातील ५३ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झालेला नाही.
मात्र तालुक्यातील बिकट परिस्थिती लक्षात घेता, येत्या काही दिवसांत दिंडोरी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून नक्की जाहीर होईल. शासनाकडून (Government) लवकरच यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.




