नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गेल्या ८० दिवसांपासून आंदोलनाला (Protest) बसलेल्यांचा आणि आमचाही अंत पाहू नका. काहीतरी तडजोड करा. समाजाला जगवण्याचे दिवस आहेत. आदिवासींमध्ये घुसण्याचा अनेक जण प्रयत्न करत असले तरी भारतीय संविधान आपला बाप आहे. त्यांचा प्रयत्न कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ (Minister Narhari Zirwal) यांनी केले.
महाराष्ट्र (Maharashtra) राज्य पेसा क्षेत्रातील सरपंच व पेसा अध्यक्षांच्या वतीने शुक्रवारी गोल्फ क्लब मैदानावर आदिवासी महापंचायत झाली. त्यावेळी झिरवाळ बोलत होते. अध्यक्षस्थानी गुलाबराव ठाकरे होते. माजी आमदार सुनील भुसारा, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, नाशिक बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर, मनसे सरचिटणीस दिनकर पाटील, बसपाचे नेते अरुण काळे वगळता इतर सर्वच लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवल्याने संयोजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापंचायत बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील पेसा व बिगरपेसा क्षेत्रातील आदिवासी सरपंच, पेसा अध्यक्ष व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
यावेळी ललितकुमार चौधरी, पांडुरंग गायकवाड, राम चौरे, डी. एम. गायकवाड, लक्ष्मण बेंडकुळे आदींची भाषणे झाली. विषय गंभीर आहे, आता खंबीर व्हावे लागेल. घुसखोरी थांबवण्यासाठी एकत्र यावे लागेल. गेल्या ८० दिवसांपासून आंदोलन करत आहे. सरकार निर्णय घेत नाही याबद्दल सर्वांनीच चिंता व्यक्त केली. आदिवासी होण्यासाठी दीडशे जाती प्रयत्न करत आहेत.त्यांना फक्त आदिवासींच्या सवलती व जमिनी हव्या आहेत. त्यावरच त्यांचा डोळा आहे. आम्हाला भजनी साहित्य देण्यापेक्षा आमच्या मुलांना नोकऱ्या द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
झिरवाळ यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या काळात जशी अनुसूचित जाती व अनु. जमातीची भरती झाली होती तशीच एकदा करण्याची गरज असल्याचे सांगितले व त्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे ते म्हणाले. प्रतिभा चौरे यांनी ठराव वाचन केले. बागुल यांनी प्रास्ताविक केले. देवा वाटाणे यांनी सूत्रसंचालन केले.
दिनकर पाटील यांच्या भाषणाला हशा आणि टाळ्या
या महापंचायतीमध्ये दिनकर पाटील (Dinkar Patil) यांच्या भाषणाला हशा व टाळ्या मिळाल्या. त्यांनी सर्व दोषांचे खापर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडले. ते म्हणाले की, भांडणे केवळ फडणवीसांनीच लावली. मी ११ वर्षे भारतीय जनता पक्षात होतो. त्यांचे उद्योग मी जवळून पाहिले आहेत. नाशिकमध्ये चार मंत्री आहेत. मात्र झिरवाळ वगळता एकही मंत्री आंदोलकांकडे फिरकत नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे पाटील म्हणाले.
विविध ठराव मंजूर
बाह्यस्रोत नोकरभरती निर्णय तत्काळ रद्द करा, १६ नोव्हेंबर २०२२ रोजीचा सुधारित आकृतिबंध रद्द करून पूर्वीप्रमाणे आदेश देण्यात यावे, मागील शैक्षणिक सत्र (२०२४/२०२५) मधील कार्यरत वर्ग तीन, वर्ग चार रोजंदारी तासिका तत्त्वावरील कर्मचारी यांना जुन्या पद्धतीने रोजंदारी तासिका तत्त्वावर शाळेच्या पहिल्या दिवसापासून हजर करून आदेशित करण्यात यावे, अनु. क्षेत्रातील (१७ संवर्ग) पेसा भरती त्वरित झालीच पाहिजे, हैदराबाद गॅझेट ग्राह्य धरून बंजारा, धनगर व इतर जातींचा आदिवासी आरक्षणात समावेश करू नये, ग्रामपंचायतमध्ये २०१४ पासून पेसा निधी ५ टक्क्यांवरून वाढत्या महागाईनुसार, वाढत्या लोकसंख्यानुसार वाढवून देण्यात यावा.




