नाशिक | Nashik
नाशिक हा एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (Maharashtra Navnirman Sena) बालेकिल्ला होता. मात्र, नाशिक शहरासह जिल्ह्याकडे राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे मागील काही काळापासून दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारे मरगळ आल्याची देखील चर्चा आहे. अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकत्यांमध्ये पसरलेली नाराजी व आगामी मनपासह जिल्हा परिषद व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला ऊर्जा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे मैदानात आले असून २३ जानेवारीपासून ते तीन दिवस नाशिक दौऱ्यावर येणार आहे.त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दौऱ्याचा (Tour) तपशील आला नसला तरी आपल्या दौऱ्यात पक्षाच्या विविध पदाधिकारी, कार्यकत्यांशी ते संवाद साधणार आहे. तसेच महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कार्यकत्यांना सूचना देखील करणार असल्याचे समजते. २०१२ साली महापालिका निवडणुकीत नाशिककरांनी (Nashik) राज ठाकरे यांच्या ब्ल्यू प्रिंटवर विश्वास ठेवत तब्बल ४० नगरसेवक निवडून दिले होते. त्यामुळे २०१२ ते २०१७ याकाळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापौर होता.त्या काळात राज यांनी नाशिकच्या विकासासाठी विशेष लक्ष दिले होते. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन चोखपणे झाले होते, तर राज यांच्या पुढाकाराने बोटॅनिकल गार्डन, बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय, ट्राफिक चिल्ड्रन पार्क, गोदा पार्क, रिंग रोड आदी महत्वाचे प्रकल्प मार्गी लागले होते.
शहराचे सुशोभीकरणावर त्यांनी विशेष लक्ष देऊन उड्डाणपुलाच्या खालीदेखील सुशोभीकरण करून घेतले. याच विकास कामांच्या जोरावर २०१७ ची महापालिका निवडणूक आपण पुन्हा जिंकू असे वाटत असताना पक्षातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येऊन पक्षातील अनेक मोठे नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकून बाहेर पडले. त्याचा फटका बसून अवये पाच नगरसेवक निवडून आले होते, मात्र आता आगामी महापालिका निवडणूक (Election) पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकत्यांनी केला असून त्यासाठी पक्षाचे युवानेते अमित ठाकरे सतत नाशिक दौरे करीत आहे तर आता राज ठाकरे देखील दौरा करणार आहे.