नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आगामी महापालिका निवडणुकीसाठी (NMC Election) प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयाद्यांतील (Voter List) त्रुटींमुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल होत असून आज २९ नोव्हेंबरपर्यंत एकूण ४,७३७ हरकती मनपाकडे दाखल झाल्या आहेत. मतदारयादीतील दुबार नावे, मयत व्यक्तींचा समावेश, चुकीच्या प्रभागात नावे टाकणे अशा विविध गंभीर त्रुटींमुळे नागरिक, राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांत नाराजी व्यक्त होत आहे.
या हरकतींची पडताळणी करण्यासाठी प्राधिकृत उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर स्वतः मैदानात उत्तरले आहेत. गुरुवारी सातपूर, तर शुक्रवारी नवीन नाशिक परिसरात (New Nashik Area) त्यांनी स्थळपाहणी करून प्रत्यक्ष हरकतींची छाननी केली. अनेक प्रभागांमध्ये नागरिकांनी गर्दी करत आपली नाराजी व्यक्त केल्याने प्रशासनावर तातडीने सुधारणा करण्यासाठी दबाव वाढत आहे.
दरम्यान, मतदारयाद्यांतील वाढत्या हरकतींच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने ३ डिसेंबरपर्यंत हरकती दाखल करण्यास दिली आहे. शिवसेना उद्योठा पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, माकप तसेच सत्ताधारी भाजप आणि शिवसेने ही मतदारयादीतील घोळांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
काही ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ
सतत वाढत जाणाऱ्या हरकती पाहता महापालिकेच्या मुख्यालयाकडून काही विभागात अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे तक्रारींचा निकाल आणि पडताळणीची गती वाढवण्याचा प्रयत्न प्रशासन करत असल्याचे दिसत आहे. तक्रारींचा निपटारा शक्य तितक्या लवकर व्हावा, यासाठी विशेष २१ पथके तयार करण्यात आली असून ते तक्रारींच्या ठिकाणी जाऊन तपासणी करीत आहे.
शनिवारी ७५३ हरकती
सुट्टीचा दिवस असूनही तक्रारी घेण्यात आल्या. आज एकाच दिवशी ७५३ हरकती दाखल झाल्या. यामध्ये सर्वाधिक हरकती नवीन नाशिक विभागातून प्राप्त झाल्या.
दुबार नावांबाबत निर्णय घ्यावा : निसाळ
जेलरोड येथील प्रभाग क्रमांक १८ मध्ये असलेल्या तब्बल ८६७ नावे दुबार तसेच इतर भागातील ४५० नावे प्रारूप यादीमध्ये आहे. सदरची बाब अतिशय धक्कादायक असून याबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे योगेश निसाळ यांनी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, प्रारूप मतदार यादीत प्रभाग क्र. १८ मधील तब्बल ८६७ नावे दुबार असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच प्रभाग क्र. १७ व २० मधील साने गुरुजीनगर, भीमनगर, जिजामातानगर, खर्जुळ मळा, पेंढारकर कॉलनी तसेच आदी भागातील ४५० नावे हे प्रभाग क्र. १८ मध्ये समाविष्ट करण्यात आलेले असून सदर बाब ही अतिशय धक्कादायक आहे. तरी प्रारूप मतदार यादीमधून आम्ही सोबत जोडलेल्या दुबार मतदारांची नावे कमी करण्यात यावी, तसेच आम्ही जी यादी सोबत जोडलेली आहे, त्या मतदारांची सहानिशा करून त्यांची नावे प्रभाग क्र. १७ व २० मध्ये समाविष्ट करण्यात यावी.
प्रारूप मतदार यादी गंभीर चुका; ठाकरे पक्षाच्या योगिता गायकवाड यांचा आरोप
महापालिकेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गंभीर चुका व विसंगती व तांत्रिक त्रुटी तपासणीत आढळून आल्या आहे. त्या त्वरित दुरुस्त करावा व खऱ्या मतदारांना न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या जिल्हा विस्तारक योगिता गायकवाड यांनी केली आहे. गायकवाड यांनी म्हटले आहे की, नाशिक महापालिका क्षेत्रातील प्रारूप मतदार याद्या तपासताना मोठ्या प्रमाणावर गंभीर चुका, विसंगती आणि तांत्रिक त्रुटी आढळून आल्या आहे. मतदार यादी पडताळणी मोहिमेत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. घरोघरी जाऊन आणि ठिकठिकाणी कॅम्पद्वारे मतदारांची पडताळणी करण्यात आली असून तज्ञ टीमच्या साहायाने याद्यांमधील घोळ शोधून त्यावर हरकती घेण्यात येणार आहे.





