नाशिक | प्रतिनिधी | Nashik
उपेक्षितांच्या मदतीसाठी ‘नाशिक रन’ मधून (Nashik Run) हजारो नाशिककर रस्त्यावर उतरले होते. शहरातील महात्मानगर मैदानावर शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘नाशिक रन’ उपक्रमात शहरातील पाच हजारांहून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळी ७.३० वाजल्यापासून सहभागी महात्मानगर मैदानावर जमा झाले होते. कार्यक्रमाच्या सूरुवातीला सर्वांसाठी वॉर्म-अप सत्र घेण्यात आले.
त्यानंतर मतिमंद, गतिंमद व लहान शालेय मुलांसाठी (Boys) २.५ किलोमीटरची ‘रन’ सुरू करण्यात आली, तर त्यानंतर प्रौढांसाठी ४.५ किलोमीटरची ‘रन’ घेण्यात आली.यात नाशिक रनच्या संचालकांसह विविध उद्योगातील कामगार अधिकारी व नाशिककर मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. नाशिक रन’ची २४ वी दौड होती. नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने समाजातील गरजू व दुर्लक्षित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन मुकूंद भट यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी नाशिक मनपा आयुक्त मनिषा खत्री (Manisha Khatri) यांनी निवडणूका समोर असल्याने लोकशाहीच्या या महाउत्सवात प्रत्येकाने मतदान करुन आपले कर्तव्य चोख बजावण्याचे आवाहन केले. कार्यक्रमस्थळी सादर करण्यात आलेल्या नृत्यप्रस्तुतींमुळे सहभागींचा उत्साह द्विगुणित झाला. तसेच सहभागींसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून आयोजनही करण्यात आले होते.




