Monday, October 26, 2026
HomeनाशिकNashik News : सप्तशृंगी गडावर कोजागरीचा उत्साह; तीन लाखांहून अधिक भाविकांनी घेतले...

Nashik News : सप्तशृंगी गडावर कोजागरीचा उत्साह; तीन लाखांहून अधिक भाविकांनी घेतले आदिशक्तीचे दर्शन

कावड यात्रा, तुताऱ्यांचा गजर आणि 'आई राजा उदो उदो'च्या जयघोषाने गड दुमदुमला

सप्तशृंगीगड | वार्ताहर | Saptshrungi Gad

आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगीगडावर (Saptashrungi Gad) यंदाचा कोजागरी पौर्णिमेचा उत्सव अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडला. नवरात्रोत्सवानंतर येणाऱ्या या महत्त्वाच्या पर्वणीनिमित्त महाराष्ट्रासह (Maharashtra) शेजारील मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातून तब्बल ३ लाखांहून अधिक भाविक आदिशक्ती श्री सप्तशृंगी मातेच्या चरणी लीन होण्यासाठी गडावर दाखल झाले होते. संपूर्ण गड परिसर भाविकांच्या अलोट गर्दीने आणि ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.

- Advertisement -

पंचामृत महापूजा व कावडीद्वारे जलाभिषेक

रविवारी (दि. २५) सकाळी विधानपरिषदेचे आमदार गोकुळ गिते (MLA Gokul Gite) आणि विश्वस्त संस्थेचे देणगीदार भाविक सुदर्शन हेगडे यांनी सपत्नीक देवीची पंचामृत महापूजा केली. रविवारी सायंकाळी विविध ठिकाणांवरून आलेल्या कावडधारकांनी आणलेल्या पवित्र जलाने देवीवर जलाभिषेक करण्यात आला. सायंकाळची महापूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा धर्मादाय सह-आयुक्त विवेक सोनूने यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनीही देवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी कळवणच्या उपविभागीय अधिकारी कश्मिरा संखे, तहसीलदार रोहिदास वारुळे, ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा अधिकारी यशवंत देशमुख आणि मंदिर पर्यवेक्षक सुनील कासार आदी उपस्थित होते.

कावड यात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन

कोजागरी पौर्णिमेच्या (Occasion of Kojagiri Purnima) पूर्वसंध्येपासूनच गडावर भाविकांची गर्दी सुरू झाली होती. शेकडो पदयात्री आणि वाद्यवृंदाच्या गजरात गडावर पोहोचलेल्या कावड यात्रा या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरल्या. ताशांचा कडकडाट, तुताऱ्यांचा आवाज आणि गुलालाची मुक्तहस्ते उधळण करत निघालेल्या पालखी मिरवणुकांमुळे गडावर अभूतपूर्व चैतन्य पाहायला मिळाले. उत्सवानिमित्त विश्वस्त संस्थेच्या वतीने भाविकांसाठी मोफत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय पिंपळनेर येथील विश्वरूहाणी मानव केंद्राच्या वतीने महाप्रसाद व मोफत वैद्यकीय शिबिराचे (मेडिकल कॅम्प) आयोजन करण्यात आले होते.

तृतीयपंथीयांचा पारंपरिक मेळावा व दीक्षा विधी

सप्तशृंग गडावर कोजागिरी पौर्णिमेला वर्षानुवर्षे चालत आलेली तृतीयपंथीयांच्या पारंपरिक मेळाव्याची प्रथा यंदाही निष्ठेने पार पडली. राज्यभरातून आलेल्या तृतीयपंथीयांनी पवित्र शिवालय तलावावर स्नान करून पूजा-अर्चा केली. त्यांच्या प्रमुख गुरूंच्या नेतृत्वाखाली वाजतगाजत छबिना मिरवणूक काढण्यात आली. परंपरेनुसार नवीन शिष्यांना दीक्षा देण्याचा धार्मिक विधी पार पडला असून रात्रभर देवीचा जागर करून नवस फेडण्यात आले.

प्रशासनाचे चोख व्यवस्थापन व वाहतूक नियोजन

गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षेचा उपाय म्हणून नांदुरी ते सप्तशृंगीगड या मार्गावर खाजगी वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने शेकडो विशेष बसेस सोडल्या होत्या. दर्शन रांगेत पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत्या. कडक पोलीस बंदोबस्त, आपत्ती व्यवस्थापन पथके व स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने एवढी मोठी गर्दी असूनही कोणताही अनुचित प्रकार न घडता हा सोहळा अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध रीतीने संपन्न झाला.

ताज्या बातम्या

Jamkhed : जामखेडमध्ये दुकान आगीत खाक

0
जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed शहरातील नगररोडवरील शासकीय विश्रामगृहासमोरील आनंद कुशन दुकानाला रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून,...