नाशिक | प्रतिनिधी | Nashik
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या स्वप्नातील महत्त्वपूर्ण तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या वॉर रूममधील रामकाल पथ हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने रामकुंड, पंचवटी परिसरातील विविध अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण, हातगाडीवाले, भाजीवाले, अनियंत्रित वाहतूक, अनियंत्रित पार्किंग, नदीत धुतली जाणारी वाहने, कपडे या गोष्टींवर नियंत्रण ठेवून परिसराचे पौराणिक, धार्मिक महत्त्व टिकवण्यासाठी रामकाल प्रकल्पातील अडचणी दूर करण्यात येणार आहेत, अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी दिली.
बुधवारी (दि.२२) आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी अधिकाऱ्यांसह गोदावरी नदी परिसराची पाहणी करून अभ्यास केला व विविध सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, शहर अभियंता संजय अग्रवाल, सहाय्यक संचालक नगररचना कल्पेश पाटील, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, उपायुक्त अतिक्रमण डॉ. मयूर पाटील आदी अधिकारी उपस्थित होते. रामकाल पथ समजून घेणे, प्रकल्प विकसित करण्यासाठी नगर नियोजन विभागाने या परिसरातील अनधिकृत बांधकामे, नदी परिसरातील बांधकामांचे सर्वेक्षण करून त्याची यादी तयार करावी, जाहिरात व परवाना विभागाने अधिकृत व अनधिकृत विक्रेत्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश यावेळी आयुक्त खत्री यांनी या पाहणी दौऱ्यात दिले.
प्रस्तावित रामकाल (Ramkal Project ) पथ परिसरात विविध ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची कामे आवश्यक आहेत, यासाठी अहिल्याबाई होळकर पुलापासून ते टाळकुटेश्वर पुलापर्यंत व तेथून राममंदिरापर्यंत गरजेच्या दोनही बाजूंच्या इमारती, रस्ते या ठिकाणी कोणती कामे करणे आवश्यक आहे, कोणती कामे करता येतील, रस्त्यांमधील इलेक्ट्रिक पोल हलवणे त्याचप्रमाणे गणेशवाडी येथे विनावापर पडून असलेल्या भाजी मार्केटचा वापर सुरू करून परिसरातील किरकोळ विक्रेत्यांना त्या ठिकाणी स्थलांतरीत करण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले.
दौऱ्यातील प्रमुख मुद्दे
१) नदी परिसरातील अस्तित्वातील पूल रामकुंड व लक्ष्मण कुंड येथील पूल, रामसेतू व इतर सांडवे यांची पाहणी करून कमकुवत झालेले पूल भविष्यातील गर्दीच्या दृष्टीने धोकेदायक ठरू नये, याची पाहणी करण्यात आली.
२) मिरवणूक मार्ग कशा पद्धतीचा असेल, भाविक कोणत्या ठिकाणी थांबतील, कोणत्या मार्गाने जातील, भाविकांना गोदावरीत स्नान करण्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या अडचणी येतील याचादेखील अंदाज यावेळी घेण्यात आला.
३) रामकुंड नदी परिसरात स्मार्ट सिटीमार्फत केलेली कामे, सार्वजनिक बांधकाम विभाग रामकाल पथ, महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात येणारी नवीन कामे यांची सांगड कशी घालता येऊ शकेल याची पाहणी झाली.
४) संपूर्ण परिसरातील शौचालय नूतनीकरणाच्या अनुषंगाने काय कामे करता येऊ शकतील, रामकुंड परिसराचे नूतनीकरणसंबंधाने कोणकोणती कामे करता येऊ शकतील, गांधी तलाव, रामकुंड व इतर बंधारे या ठिकाणी बसवण्यात आलेले गेट व नादुरूस्त गेटची पाहणी करण्यात आली.
५) सिंहस्थकाळात आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी अतिरिक्त आपत्कालीन मार्ग म्हणून होळकर पुलाच्या डाव्या बाजूस पायऱ्या करण्यावर चर्चा झाली. या परिसरात येणारी वाहने नो प्लास्टिक झोन, नो व्हेईकल झोन करून इतर ठिकाणी मुबलक पार्किंग जागा व व्यवस्था निर्माण करण्यावर व नवीन पार्किंगची ठिकाणे विकसित करण्यासाठी आढावा घेण्यात आला.
६) नाशिक शहरासाठी काळाराम मंदिराचे पौराणिक महत्त्व लक्षात घेता तसेच साधू-महंत यांचा काळाराम मंदिराशी असलेला जिव्हाळा लक्षात घेता मंदिराच्या सभोवताली, रामकाल पथाच्या अनुषंगाने काळाराम मंदिर परिसरातील पार्किंगच्या अनुषंगाने काही जागांचे संपादन करणे आवश्यक असल्याने पाहणीत निदर्शनास आले.