नाशिक | प्रतिनिधी
मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी सोमवारी (दि.२१) मनपात वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कामांना गती देण्याचे आदेश दिले.
मनपात झालेल्या बैठकीत स्मार्टसिटी, मनपा बांधकाम विभाग, यांत्रिकी विभाग, पाणी पुरवठा, उद्यान विभाग, विद्युत विभाग, आयटी विभाग, वाहतूक कक्ष व महावितरण या विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रामकालपथसाठी जास्तीत जास्त खोदकाम करावे लागणार आहे. त्यादृष्टीने संबंधित सर्व विभागांनी आपल्याला करावयाच्या कामांची माहिती लवकरात लवकर कंपनीच्या सल्लागाराला द्यावी, म्हणजे पुढील काम सोपे होईल. रामकाल पथ मार्गावर खोदकाम होईल, त्यासाठी एमएनजीएल, बीएसएनएल, स्मार्ट सिटीसह बांधकाम विभागाने करावयाच्या कामांचे नियोजन सल्लागारांना सादर करावे. त्यानंतर सल्लागार कामाबाबत निर्णय घेईल व प्रत्यक्ष कामास सुरुवात करणार आहे. याशिवाय बैठकीत इंडिग्रेटेड कमांड कंट्रोल सिस्टिमचा (आयसीसी) आढावा घेण्यात आला.
शिवाय स्मार्ट सिटीला जीआयएस संपूर्ण डेटा लवकरात लवकर उपलब्ध करून काम सुरू करण्याचे आदेशित करण्यात आले. स्मार्ट सिटीकडून महापालिकेला सात प्रकल्प हस्तांतरित केले जाणार आहे. त्यात मुख्य म्हणजे गोदापार्क प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पाचा करार झाला असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. हे प्रकल्प हस्तांतरण करण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून प्रक्रिया सुरू आहे.
पावसाळ्यात गोदावरीला येत असलेल्या पुरामुळे लगतच्या घरांमध्ये पाणी शिरते. यामुळे पुराचे नियंत्रण करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुलाखाली मेकॅनिकल गेटची उभारणी करण्यात येत आहे. गोदावरीला दरवर्षी येत असलेली पूरस्थिती नियंत्रणासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर पुलाखाली २२ कोटी रुपये निधीतून मेकॅनिकल गेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटी कंपनीने २०१९ मध्ये हा प्रकल्प सुरू केला होता. मात्र, ठेकेदाराच्या संथ कामामुळे प्रकल्प रेंगाळला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा