नाशिक | प्रतिनिधी
नाशिक मनपाचे विद्यार्थी आता अमेरिकेची जगविख्यात अंतराळ एजन्सी नॅशनल एरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात नासाला भेट देणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांची मेरीट टेस्ट घेतली जाणार असून पहिल्या शंभर विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना नासाची सफर घडवली जाणार आहे. त्यासाठी सर्व खर्च महापालिका करणार आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये स्मार्ट स्कूलद्वारे डिजिटल क्रांती आणल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे मनपा शिक्षणाधिकारी बापूसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा क्र. १८ च्या विद्यार्थ्यांनी बंगळुरू येथील इस्त्रोच्या कार्यालयाला भेट देऊन अंतराळशास्त्राचा अभ्यास केला. तेथे रॉकेटचे उड्डाण, अवकाशात सॅटेलाईट उपग्रह कसे सोडले जातात, त्याचा कंट्रोल जमिनीवरून कसा केला जातो तसेच अवकाशातील विविध उपग्रहांपर्यंत अॅन्टिनाद्वारे पाहिजे तेव्हा कसे पोहोचले जाते, आजपर्यंत इस्रोने सोडलेले विविध उपग्रह व यापुढे इस्रोचे असलेले प्रोजेक्ट अशा विविध बाबींचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला. रॉकेट प्रक्षेपण कसे केले जाते याचे प्रात्यक्षिकही इस्रोच्या शास्त्रज्ञांनी करून दाखवले.
आता एवढ्यावरच न थांबता मनपा शिक्षण विभाग अमेरिकेतील नॅशनल एरॉनॉटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेला भेट देण्याची तयारी करत आहे. त्यासाठी मनपाच्या शाळातील आठवीच्या विद्यार्थ्यांची मेरीट टेस्ट घेतली जाईल. त्यातील गुणवत्तेनुसार २५ विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. त्यांना नासाची सफर घडवली जाईल. जगभरातील अंतराळप्रेमींसाठी नासाला भेट देणे स्वप्न असते. मनपा शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून देणार असून यासाठीचा येणारा सर्व खर्च मनपा करणार आहे. त्याचप्रमाणे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विद्यार्थ्यांना संसद व राष्ट्रपती भवनची सफर घडवली जाणार आहे. मनपा शाळा क्र. २४ व ८६ विद्यार्थ्यांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. देशाचे कामकाज कसे चालते हे दाखवणे हा दिल्ली वारीचा उद्देश्य आहे.
नाशिक मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना अंतराळ मोहिमांची माहिती मिळावी, यासाठी इस्त्रोला भेट देण्यात आली होती. आता त्याही पुढे जात अमेरिकेची अंतराळ एजन्जी नासाला भेट दिली जाणार आहे. या मोहिमेवर काम सुरू असल्याचे शिक्षणाधिकारी बापुसाहेब पाटील यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा