नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकमधील (Nashik) मानव-बिबट्या संघर्ष रोखण्यासह बिबट्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील पूर्व आणि पश्चिम वनविभागाने एकत्रित १६ कोटी रुपयांचा नवा आराखडा सादर केला आहे. या आराखड्यात रॅपिड रेस्क्यू टीम (आरआरटी), रेस्क्यू वाहने, पिंजरे यांसह विविध बाबींचा समावेश आहे. हा निधी वनविभागाला आपत्ती व्यवस्थापनांतर्गत अपेक्षित असून प्राथमिकदृष्ट्या पहिल्याच बैठकीत पिंजऱ्यांसाठी ५० लाख तर चार आरआरटीसाठी चार वाहने मंजूर करण्यात आली आहेत.
बिबट्यांवर (Leopard) नियंत्रणासाठी मागील आठवड्यात वनमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्या बैठकीतील सूचनांनंतर वनविभागाने (Forest Department) नाशिक जिल्ह्यासाठी १५ कोटी ८१ लाख १५ हजार २०० रुपयांचा आराखडा तयार केला. या आराखड्यातील तातडीची बाब म्हणून जिल्हा प्रशासनाने पिंजऱ्यांसाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला असून चार रॅपिड रेस्क्यू टीमसाठी (आरआरटी) चार वाहनेही मंजूर करण्यात आली आहेत.
यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एक कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. नागरी भागातील बिबट्याचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याच्या उपायांचा त्यात समावेश नाही. बिबट्यांच्या ट्रान्झिट सेंटरला मान्यता दिला असली तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी वन्यजीव संरक्षण विभागाच्या मान्यतेनंतरच होऊ शकणार आहे. या ट्रान्झिट सेंटरची क्षमता साधारणतः अनुसूची एकमध्ये मोडणाऱ्या ४० हिंस्र प्राण्यांसाठी असणार आहे.
१२० गावांत शिरकाव
जिल्ह्यात मागील अकरा महिन्यांत बिबट्यांचा मानवी वस्तीत विशेषतः शहरात वावर वाढला आहे. हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. दहा बालके व माणसांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. अनुसूची-१ मध्ये समावेश असल्याने बिबट्यांना मारण्यास परवानगी नाही. जिल्ह्यातील साधारणतः १२० पेक्षा अधिक गावांमध्ये मागील १० वर्षांत बिबट्यांनी मानवांवर हल्ले केले आहेत. दरम्यान, बिबट्यांच्या टीटी सेंटरला (ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर) स्थानिक प्रशासनाने मंजुरी दिली असून आता वनविभागाच्या कोर्टात चेंडू आहे. मंजुरी मिळताच ते उभारले जाणार आहे. म्हसरुळच्या टीसीसीमध्ये बिबट्यांसाठी जागा अपुरी पडत असून विस्तारीत सेंटरमुळे समस्या काहीशी सुटण्याची शक्यता आहे.
असा आहे आराखडा
- जलद बचाव पथक सक्षमीकरण ३० टीम (एका टीममध्ये ६ मनुष्यबळ) – ५३ लाख ३५ हजार २०० रुपये,
- रेस्क्यू वाहन (१६) २ कोटी ४० लाख
- आरआरटीसाठी साहित्य: ४५ लाख
- जनजागृतीसाठी सभा, साहित्य: ७० लाख
- बेस कॅम्प, कंट्रोल रुम, मेटेनन्स: ७० लाख
- औषधे, ट्रॅन्क्युलायझर गन: ३३ लाख
- पिंजरे आणि प्राथमिक कृतिदल ६ कोटी ५० लाख रुपये
- ड्रोन, कॅमेरा, ट्रॅप्स, टॉर्च व जीपीएस : १ कोटी ९८ लाख
- ए.आय बेस्म कॅमेरा (२०) ६० लाख
- गन, पिस्टल ३३ लाख रुपये
- मोठ्या जाळ्या (४०) २४ लाख रुपये




