नाशिक | प्रतिनिधी
राज्यातील शासकीय रुग्णालयांमधून आरोग्य सुविधा पुरवण्यात नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील ग्रामीण, उपजिल्हा व सामान्य रुग्णालये चालू आर्थिक वर्षात अग्रेसर राहिले आहेत, असे एका सर्वेक्षणाच्या दाव्यातून समोर आले आहे. राज्यातील जिल्हानिहाय रुग्णालय निर्देशांकनिहाय आरोग्य सुविधांच्या आढाव्यात नाशिक जिल्हा रुग्णालय अव्वल ठरले. त्यात उपचार घेणाऱ्यांची संख्या इतर जिल्हा रुग्णालयांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
आरोग्य संस्थांचे रुग्ण व्यवस्थापन, तत्काळ उपलब्ध सुविधा, तज्ज्ञ चिकित्सकांकडून आजाराचे अचूक निदान, आवश्यकतेनुसार होणाऱ्या तपासणी, योग्य औषधोपचार, शस्त्रक्रिया, सहाय्यकारी उपचार आदी बाबी रुग्णालय निर्देशकांत तपासले जातात. त्यानुसार आरोग्य विभागामार्फत एप्रिल २०२४ पासून २५ जानेवारी २०२५ पर्यंत या कालावधीतील राज्यातील आरोग्य यंत्रणांचा आढावा घेण्यात आला. त्यात जिल्हा रुग्णालयांसह ग्रामीण, उपजिल्हा व सामान्य रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार करण्याच्या पद्धतींचा विचार करण्यात आला. त्यानुसार राज्यात सर्वाधिक उपचार नाशिक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये झाले आहेत. नाशिक जिल्हा रुग्णालयासह इतर ३२ उपजिल्हा, ग्रामीण व सामान्य रुग्णालयांमध्ये मिळून सर्वाधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
सांघिक कामामुळे यश
जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये व सामान्य रुग्णालयातील आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सांघिक कामामुळे हे यश मिळाले आहे. आरोग्य सुविधांमुळे जिल्ह्यातील रुग्णांना त्याचा लाभ मिळत आहे. डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी हे अहोरात्र सेवा देत एकदिलाने काम करत आहेत. त्यामुळे हे यश मिळाले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे म्हणाले.
नाशिकच्या रुग्णालयात झालेले उपचार (कंसात दुसऱ्या स्थानावरील जिल्हा)
बाह्य रुग्ण विभागातील रुग्णसंख्या २१,६९,६३३ (२०,४७,०१४ पुणे)
आंतररुग्ण विभागातील रुग्णसंख्या १,८२,६३६ (१,४१,५८२ अमरावती)
मोठ्या शस्त्रक्रिया १६,१८८ (१५,८६३ अमरावती)
किरकोळ शस्त्रक्रिया ४१,८२३ (३६,९९१ अमरावती)
प्रयोगशाळेतील तपासणी २०,४३,०२४ (१४,७१,७०२ पुणे)
एक्सरे १,८०,७२६ (१,५७,४६१ पुणे)
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा