समृध्दी आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्ग जोडणीच्या रस्त्याला केंद्राकडून मान्यता
नाशिक | प्रतिनिधी
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला नाशिक-मुंबई महामार्ग जोडण्यात येणार असल्यामुळे मुंबई नाशिकचे अंतर कमी होणार आहे. सध्याच्या घडीला तीन ते साडेतीन तासांचा प्रवास करून मुंबई गाठावी लागत आहे. जर समृद्धी महामार्गाला नाशिक मुंबई महामार्ग जोडण्यात आला तर हे अंतर जवळपास एक ते सव्वा तासांनी कमी होणार आहे. तसेच या महामार्गावरील अपघातांना आळा बसावा, नाशिक-मुंबई प्रवासाचा कालावधी कमी व्हावा, वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी समृध्दी महामार्गाची जोडणी नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनला व्हावी यासाठी खासदार हेमंत गोडसे पर्यंत करत होते.
अखेर समृध्दी महामार्ग आणि नाशिक-मुंबई महामार्ग यांना जोडणा-या इगतपुरी जवळील पिंप्री सदो येथील वाढीव रस्त्याच्या प्रस्तावाला केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्रालय आणि राज्याच्या एमएसआरडीसीएलने तत्वत: मान्यता दिली आहे.
यामुळे दोन्ही महामार्गांच्या जोडणीच्या ठिकाणी तयार होणा-या जंक्शनवर पंधरा बाय साडेपाच मीटर आकाराच्या डबल अंडरपासच्या वाढीव कामासाठीही तत्वत: मंजुरी मिळाली आहे.
महामार्गांच्या जोडणीमुळे नाशिककरांना आता अवघ्या अडीच तासातच मुंबईला पोहचणे शक्य होणार असून उद्योग, व्यवसायाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
इगतपुरी बायपासच्या पिंप्री सदो येथे समृध्दी महामार्ग उतरणार आहे. पिंप्री सदो येथून जवळच काही अंतरावर नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन आहे.
राष्ट्रीय महामार्गाची जोडणी समृध्दी महामार्गाला व्हावी यासाठी या दोन्हीही महामार्गांच्या दरम्यानचा रस्ता व्हावा तसेच दोन्ही महामार्गांच्या जोडणीमुळे पिंप्री सदो येथे तयार होणा-या जंक्शनवर मोठया आकाराचा अंडरबायपास असावा यासाठी गेल्या वर्षभरापासून खासदार हेमंत गोडसे प्रयत्नशील होते.
गोडसे यांनी या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी अनेकदा केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली होती. सदर प्रस्तावाच्या मान्यतेसाठी गोडसे यांचा केंद्राकडे तसेच राज्याच्या एमएसआरडीसीएलने सतत पाठपुरावा सुरू होता. आज अखेर गोडसे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
समृध्दी महामार्ग आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनला जोडणा-या पिंप्री सदो येथील वाढीव रस्त्याच्या कामाच्या प्रस्तावाला आज केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्रालयाने, राज्याच्या एमएसआरडीसीएलने तत्वत: मान्यता दिली आहे.
यामुळे समृध्दी महामार्ग आणि नाशिक-मुंबई महामार्ग यांची जोडणी होणार आहे. जोडणीमुळे तयार होणा-या जंक्शनवर पंधरा बाय साडेपाच मीटरच्या मोठया आकाराचा अंडरबायपासलाही रस्ते वाहतुक मंत्रालयाने तत्वत: मान्यता दिली आहे.
यामुळे आता इगतपुरी बायपास, पिंप्री सदो येथील वाहतुकीची कोंडी सुटणार असून अपघातांवरही आळा बसणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही महामार्गांच्या जोडणीमुळे नाशिक-मुंबई प्रवासासाठी कमी वेळ लागणार आहे.
अवघ्या सव्वादोन ते अडीच तासात आता नाशिककरांना मुंबईत पोहचणे शक्य होणार आहे. यामुळे जिल्हयातील उद्योग,व्यवसायाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे. पिंप्री सदो ते गोंदे सहापदरी रस्त्याचा प्रस्तावही मान्यतेसाठी लवकरच पाठविणार असल्याचे गोडसे यांनी स्पष्ट केले आहे.