नाशिक | Nashik
शहरातील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाची समस्या सोडवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation) आज (शनिवारी) धडक कारवाई केली. सारडा सर्कल आणि मुंबई नाका परिसराच्या (Mumbai Naka Area) जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील अनधिकृत हॉटेल्स, टपऱ्या आणि पक्क्या दुकानांच्या बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने थेट बुलडोझर चालवला.
गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील अनधिकृत व्यावसायिक बांधकांमांमुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त आणि अतिक्रमण विभागाच्या प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली. महापालिकेने संबंधित अनधिकृत हॉटेल चालक आणि दुकानदारांना (Shops) स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, व्यावसायिकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर ही कारवाई करण्यात आली.
आज सकाळीच मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक जेसीबी (JCB), बुलडोझर आणि कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह सारडा सर्कल परिसरात दाखल झाले. बघता बघता रस्त्याकडेला असलेले अनधिकृत शेड, ओटे आणि हॉटेल्सचे अनधिकृत भाग जमीनदोस्त करण्यात आले. कारवाई दरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून घटनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा
सारडा सर्कल हा अत्यंत गजबजलेला भाग असून, येथून राष्ट्रीय महामार्गाकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. अनधिकृत हॉटेल्स आणि त्यांच्याबाहेर होणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे येथे रोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या.आज झालेल्या या धडक कारवाईमुळे रस्ता मोकळा झाला असून वाहन धारकांनी आणि स्थानिक नागरिकांनी मनपाच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.




